शिरोडा वेळागरवाडी येथील खार बंधाऱ्याला भगदाड, शेती-बागायतीचे नुकसान…

39
2
Google search engine
Google search engine

विहिरींचे पाणी झाले खारट ; शासकीय अधिकारी फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप…

वेंगुर्ले,ता.२२: तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील खार बंधाऱ्याला नुकत्याच झालेल्या चक्री वादळामध्ये मोठे भगदाड पडले. यामुळे खारे पाणी शेती बागायतीत घुसले असून ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच जवळच्या चार विहिरींचे पाणी खारट बनल्याने येथे पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मात्र संबंधित विभागाकडून आज सहा दिवसानंतर ही या भागाची पाहणी करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
खारभूमी विभागामार्फत वेळागरवाडी येते खार बंधारा बांधण्यात आला आहे. या खार बंधाऱ्याचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. दरम्यान नुकत्याच आलेल्या तौकती चक्रीवादळाचा फटका किनारी भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. वेळागरवाडी येथील खार बंधाऱ्याला भलेमोठे भगदाड पडल्याने खारे पाणी शेती आणि बागायती मध्ये घुसले आहे. यामुळे शेती बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच हे खारे पाणी घुसल्याने येथील जमीन नापीक बनली असून वेळागरवाडी येथील भाई रेडकर, राजू आंदुलेकर, काका आरोसकर, गुरुनाथ रेडकर यांच्या गोड्या पाण्याच्या विहिरींमधील पाणी खारट झाले आहे. त्यामुळे या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सहा दिवसानंतरही खार लँड विभागाचे अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी येथे फिरकले नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे यांनी काल तहसीलदार प्रवीण लोकरे यांची भेट घेऊन या याबाबत तक्रार केली आहे.