सिंधुदुर्गातील दिव्यांग व निराधार व्यक्तींसाठी “व्हेक्सिनेशन ऑन व्हील” उपक्रम…

73
2
Google search engine
Google search engine

 

ओरोस ता.२८: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व आश्रमामध्ये आश्रित असलेल्या निराधार व्यक्ती यांच्यासाठी “व्हेक्सिनेशन ऑन व्हील” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद टास्क फोर्स बैठकीत घेण्यात आला.यानुसार आरोग्य विभागाच्या दोन गाड्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व विविध सेवा आश्रमातील निराधार व्यक्ती यांचे पर्यंत पोचून त्यांच्यासाठी लसीकरण करणार आहेत. या गाड्यांचा शुभारंभ वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यातून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता कोरोना साथ निवारणाच्या अनुषंगाने टास्क फोर्स बैठक संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महिला बालविकास सभापती शर्वाणी गांवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन राजेंद्र पराडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, तालुक्यातील गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला होता.
जिल्ह्यातील दिव्यांग बांधव यांची यादी देखील बनविण्यात आली आहे .सुरुवातीला चारशे लस उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करत असल्याचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी संदेश कांबळे यांनी बैठकीत सांगितले. तसेच कोरोना लाटेच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांचे संरक्षण करता यावे यासाठी निश्चित धोरण तयार करण्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टर फेडरेशनची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बैठक आयोजित करण्याचे निर्देश देखील अध्यक्ष यांनी दिले. तसेच तालुक्यातील हॉटस्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी झोनल अधिकारी यांची नियुक्ती करून त्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करणे. त्या भागातील लोकांची टेस्ट करून घेणे. जर अशा बाबतीत कोणी दबाव टाकत असेल किंवा आरोग्य यंत्रणेशी दादागिरी करत असेल तर स्थानिक पोलिस यंत्रणेच्या सहकार्याने त्या ठिकाणी पथक नेमून टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे निर्देश सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.