सर्जेकोटात कोरोना योध्यांचा सत्कार…

143
2
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; गुणवंत विद्यार्थ्यांसह, खवले मांजरास जीवदान दिलेल्या चिमुकल्यांनाही गौरविले…

मालवण, ता. ३१ : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांसह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची सर्जेकोट शिवसेना प्रभागाने दखल घेत कोरोना योध्यांसह, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच खवले मांजरास जीवदान देण्यात योगदान दिलेल्या चिमकुल्यांचा गौरव करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे असे प्रतिपादन सर्जेकोट मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनंदन खडपकर यांनी सर्जेकोट येथे केले.
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना मुक्त सर्जेकोट मिर्याबांदा गावात आज कोरोना योध्या, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अमोल वस्त, ज्येष्ठ शिवसैनिक रघुनंदन खडपकर, विनायक कोळबंकर, विनायक आरोलकर, ग्रामपंचायत सदस्या भारती आडकर, स्नेहा शेलटकर, केशव सावजी, रेश्मा कुर्ले, ज्येष्ठ नागरीक केसरीनाथ मायबा, किसन आचरेकर, दयावती जामसंडेकर, केतकी सावजी यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात कोरोना महामारीच्या कठीण काळात ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली अशा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षकवृंद, पोस्टमन, कोतवाल अशा व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचबरोबर गावातील प्राथमिक शाळेतील विशेष प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी तसेच गतवर्षी दहावी, बारावी तसेच यावर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गौरवपत्र देत गौरविण्यात आले. सर्जेकोट गावात पर्यावरण दिनीच आढळलेल्या खवले मांजरास ज्या चिमुकल्यांमुळे जीवदान मिळाले त्या सर्व चिमुकल्यांचा यावेळी भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात विरोधकांकडून टीका झाली. मात्र या टीकेला मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई पोटी भरघोस निधी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देत चोख प्रत्युत्तर दिले. या नुकसान भरापाईचा गावातील सर्वसामान्यांसह, मच्छीमार बांधवांना लाभ मिळाला याबद्दल गावाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या भारती आडकर यांनी मुख्यमंत्र्यांचे तसेच आमदार श्री. नाईक यांचे आभार मानले.
सूत्रसंचालन राजन आचरेकर यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक भारती आडकर यांनी केले तर विनायक कोळंबकर यांनी आभार मानले.