शिवसेनेच्या परुळेकरांची भूमिका मायनिंग विरोधात,की समर्थनात…?

159
2
Google search engine
Google search engine

आशिष सुभेदार; पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मायनिंग बंद करून दाखवा,मनसे सत्कार करेल…

सावंतवाडी ता.०८: जिल्हाधिकाऱ्यांचे मायनिंग बंदचे आदेश फसवे असल्याचे आरोप करणारे शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर कळणेवासियांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.त्यामुळे परुळेकरांची भुमिका मायनिंग विरोधात,की समर्थनात ?,असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे.दरम्यान श्री.परुळेकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मंत्रालय पातळीवर कळणे मायनिंगसह जिल्ह्यातील सर्व खाणींवर पूर्णतः बंदी आणून दाखवावी,आम्ही मनसेच्या माध्यमातून त्यांचा जाहीर सत्कार करू,असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.याबाबत श्री.सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,श्री.परुळेकर यांनी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मंत्रालय पातळीवर कळणे मायनिंगसहीत जिल्ह्यातील सर्व खाणींवर पूर्ण बंदी आणून दाखवावी.आवाज फाउंडेशनच्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने खाण प्रकल्पांना स्थगिती दिली आहे.तसेच दोडामार्ग,वेंगुर्ला या दोन तालुक्यांमध्ये वृक्षतोड बंदी,मायनिंग प्रकल्पना बंदी यासाठी ईसीआय लावलेला आहे.तरीही उत्खनन होत आहे ही बाब गंभीर आहे.२००९ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मायनिंगमुळे जिल्ह्याचा कोळसा होऊ देणार नाही,असे वक्तव्य केले होते.श्री.परुळेकर यांनी स्वत: पुढाकार घेऊन मंत्रालय पातळीवर मायनिंगला पूर्णपणे बंदी आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मायनिंग बंदचे आदेश फसवे असल्याचे सेना प्रवक्त्यांचे मत हे कळणेवासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेले मायनिंग बंदचे आदेश हे लोकभावना तसेच शेतीचे नुकसान याचा विचार करून दिलेले आहेत.सदरचे आदेश मंत्रालय पातळीवर रद्दबातल ठरवून पुन्हा मायनिंग सुरू होवू शकते.यासाठी कळणेवासीय चिखल आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी जाहीर केला आहे.शिवसेनेत असताना उपरकर यांनी गाडगीळ अहवालाचे समर्थन करत मायनिंगला विरोध केला होता.आजही मनसेत त्यांची भूमिका मायनिंग विरोधातच आहे.सुरुवातीपासूनच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी,खनिकर्म अधिकारी मायनिंगला जबाबदार आहेत असे उपरकर यांनी म्हटले आहे.
जयेंद्र परुळेकर यांनी या अगोदर गाडगीळ अहवालाचे समर्थन करून मायनिंग विरोधात परशुराम उपरकर यांच्यासोबत जनजागृतीही केली होती.त्यांच्यासोबत जनसुनावणी वेळी व्यासपीठावरून मायनिंगला विरोध केला होता हे आम्ही मान्य करतो.पण नंतरच्या काळात आपण राणे कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता.त्यावेळी काँग्रेस मायनिंग माफीयांसोबत होती.त्यामुळे तुमची नक्की भुमिका मायनिंग विरोधात आहे की मायनिंग समर्थनात आहे?हे जनतेसमोर स्पष्ट करावे.
पालकमंत्री,आमदार यांना मायनिंग माफियांकडून लक्ष्मी दर्शन होण्याअगोदर तसेच भकास होणाऱ्या या जिल्ह्याला वाचवण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न करावेत.आपण सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात.सत्ताधारी मंत्री, लोकप्रतिनीधी,पालकमंत्री यांच्या माध्यमातून प्रकल्पांना कायमस्वरुपी बंदी आणावी.मनसेच्यावतीने आम्ही तुमचा सत्कार करु असेही आशिष सुभेदार यांनी पत्रकात म्हटले आहे.