भू-विकास बँक कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी…

242
2
Google search engine
Google search engine

एम. पी. पाटील ; २० वर्षाच्या कर्मचारी संघटनेच्या लढ्याला मिळाले यश…

मालवण, ता. १८: भू-विकास बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या २० वर्षापासूनचा थकीत वेतनाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री व अधिकाऱ्यांच्या समवेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय झाला आहे. अशी माहिती भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली .
यासाठी खासदार व भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या लढायचे हे यश आहे असेही श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला खासदार व भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, बच्चू कडू, राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार वैभव नाईक, सहकार सचिव, सहकार आयुक्त, भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे सदस्य कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनसह इतर अनुदान व भत्त्याची रक्कम गेल्या वीस वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून वारंवार निवेदने आंदोलनाचे मार्ग अवलंबिण्यात आले होते.
या अनुषंगाने श्री. पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये भू-विकास बँकेच्या ज्या इमारती राज्य सहकारी बँकेला घेणे शक्य आहे. त्या त्यांनी घ्याव्यात व कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन व इतर देणी द्यावेत. तसेच ज्या इमारती राज्य सहकारी बँकेला घेणे शक्य नाही त्या राज्य सरकारकडे हस्तांतरित कराव्यात व कर्मचाऱ्यांची उर्वरित देणी त्यामधून चुकती करावीत. याशिवाय भू-विकास बँकेच्या ३६ हजार ८१५ शेतकऱ्यांकडे ३४८ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांकडून कर्जपोटी येणे बाकी आहे. ती अद्याप वसूल झालेली नाही. भविष्यातही बँक कामकाज बंद असल्यामुळे भविष्यातही वसुल होणे शक्य नसल्यामुळे कर्जमाफी सदराखाली त्याचा हिशोब पूर्ण करावा व हा विषय संपुष्टात आणावा. असा महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. त्यामुळे या कर्जदार शेतकऱ्यांसह भू-विकास बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री पवार यांचे कर्मचारी व शेतकरी यांच्यावतीने खासदार अडसूळ यांनी आभार मानून अभिनंदन केले.