मुख्यमंत्र्यांसह अनिल परब व संजय राऊतांवर सुद्धा गुन्हे दाखल करा…

225
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी भाजपा आक्रमक; पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सुपूर्द…

सावंतवाडी ता.२५: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आज सावंतवाडी भाजपाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब व आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. याबाबतच्या मागणीचे निवेदन सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री.ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात योगींवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत जसा श्री.राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तशाच प्रकारे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच राणेंना तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांना दमदाटी करणाऱ्या श्री.परब व आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या श्री.राऊत यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले,महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी,केतन आजगावकर, बंटी पुरोहित,ज्ञानेश्वर पाटकर,धिरेंद्र म्हापसेकर,आदी उपस्थित होते.