जुन्या पंधरा व्यापाऱ्यांना गाळे न मिळाल्यास आत्मदहन आंदोलन…

118
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्लेत व्यापारी आक्रमक ; जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना दिले निवेदन…

वेंगुर्ले,ता.२५: नगरपरिषद सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळमजल्यावरील १५ जुन्या गाळेधारकांना गाळे मिळाले पाहिजेत या मागणीसाठी आता व्यापारी आक्रमक बनले आहेत. अटी शर्तींची पूर्तता करूनही आम्हाला पुनप्रस्थापित न केल्यास आम्ही उग्र आंदोलन करून सर्व संबंधीत व्यापारी आत्मदहन करून घेणार आहोत, अशा आशयाचे निवेदन आज बुधवारी संबंधित व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना दिले आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मालकीचे वरील १५ गाळे हे आमच्या व्यापाऱ्यांना विस्थापित करून बांधण्यात आले आहेत. त्यांना त्याठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी नगरपरिषदेला आम्ही वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तसेच नगरपरिषद कौन्सीलचे तसे ठरावही झालेले आहेत. तरी त्या अनुषंगाने नविन जागेत या जुन्या व्यापाऱ्यांना प्रस्थापित करण्यासाठी निवेदन देऊनही व सर्व अटी शतींची पूर्तता करूनही पुनप्रस्थापित न केल्यास आम्ही उग्र आंदोलन करू. तसेच संबंधीत व्यापारी आत्मदहन करून घेणार असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन सादर करताना व्यापारी संजय तानावडे, लक्ष्मण देिपनाईक, किशोर परब, महेंद्र सामंत, सुजल मोरे आदी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनाची प्रत ही सोबत जोडली आहे.