पालकमंत्री व आमदारांना गणपतीबाप्पाने या वर्षी तरी सद्बुद्धी द्यावी…

2
2
Google search engine
Google search engine

राजन तेलींचा टोला; “त्या” आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी….

सावंतवाडी,ता.०६: पालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक केसरकर यांचा मतदारसंघात लक्ष नसल्यामुळे लोकांना यावर्षीही गणपती बाप्पा खड्डेमय रस्त्यावरून आणावा लागणार आहे. त्यामुळे आता तरी त्या दोघांना बाप्पाने सद्बुद्धी द्यावी, असा टोला आज पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी लगावला. दरम्यान एनआरएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेऊन आगामी भरतीत प्राधान्याने सामावून घ्या, अशी मागणी आज येथे आयोजित पत्रपरिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, माजी सभापती रवि मडगांवकर, कमलाकांत परब, अनुसूचित जाती प्रदेश सदस्य चद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, गणेशोत्सवात मुंबई व अन्य शहरांमधील अडीच ते तीन लाख चाकरमानी गावात दाखल होणार आहेत.मात्र, याच तोंडावर १ सप्टेंबर पासून आरोग्य विभागाने एनआरएचएमचे तब्बल ३४२ कर्मचारी कमी केले आहेत. मुळातच जिल्ह्यात आरोग्य विभागात ५३६ पदे रिक्त असताना या कर्मचाऱ्यांची कपात केल्यामुळे दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या तपासणी वेळी त्यांचे राज्य सरकार हाल करणार आहे, असा आरोपही त्यांनी केला. तेली पुढे म्हणाले, एनआरएचएमच्या या कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू करण्यात यावे, तसेच नवीन भरतीत या अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा भाजपच्यावतीने रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ही खास बाब म्हणून केंद्राकडून एनआरएचएम साठी निधी द्यावा, असेही आवाहन केले आहे. प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावागावांमध्ये ही लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असून लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावांमध्ये अधिक कोटा देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून आता तरी राज्याने केंद्राकडे बोट दाखविणे थांबवावे, असा टोला यावेळी राजन तेली यांनी लगावला.