इतकी आंदोलन झाले तेव्हा ठेकेदार कुठे लपून बसले होते…?

3
2
Google search engine
Google search engine

साई काणेकरांचा सवाल; बांदा- दोडामार्ग रस्त्याचा ठेका पुन्हा मिळवण्यासाठी धडपड…

बांदा, ता.०७: येथील बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी आतापर्यंत एवढी आंदोलने झाली, मात्र त्यावेळी या रस्त्याचा ठेका घेतलेले ठेकेदार कुठे लपून बसले होते? असा सवाल बांदा शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी केला आहे.

दरम्यान केवळ लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी व रद्द झालेला ठेका पुन्हा मिळविण्यासाठी ठेकेदारांची केविलवाणी धडपड सुरू आहे. यासाठीच दोडामार्ग तालुक्यातील जनतेची माफी मागण्याचा डाव रचण्यात आला आहे, मात्र जोपर्यंत बांदा शहरातील डोंगरआळी, गडगेवाडी व पानवळ येथील जनतेची ठेकेदार जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असे काणेकर यांनी म्हटले आहे

ते म्हणाले की, बांदा-दोडामार्ग रस्त्याची दुर्दशा होण्यामागे पूर्णतः ठेकेदार जबाबदार आहेत. ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळेच आमदार दीपक केसरकर यांची नाहक बदनामी झाली आहे. जुन्या निविदा रद्द करून पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने या ठेकेदारांनी रस्त्याचा मक्ता मिळविण्यासाठी सामाजिक बांधिलकीचे ढोंग करत आहेत. जनतेची माफी मागून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काणेकर यांनी केला आहे.

या ठेकेदारांनी बांद्यात येऊन जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा काम सुरू करू देणार नसल्याचे काणेकर यांनी सांगितले.