एका महिन्यात छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराबाबत निर्णय घेऊ…

2
2
Google search engine
Google search engine

उदय सामंत ; कणकवली नगरपंचायत सभागृहात पुतळा स्थलांतराबाबत बैठक…

कणकवली, ता.०८ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराबाबत गेली तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता फक्त एक महिना थांबा. आजपासून लगेच पुतळा स्थलांतराबाबतची कार्यवाही सुरू करतो आणि महिन्याभरात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
महामार्ग चौपदरीकरणात कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाधित होत आहे. या पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर व्हावे याअनुषंगाने आज नगरपंचायत सभागृहात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, मराठा समाज संघटनांचे प्रतिनिधी, नगरपंचायत पदाधिकारी यांची बैठक झाली. यात पालकमंत्री श्री.सामंत यांनी एका महिन्यात पुतळा स्थलांतराबाबत कार्यवाही करू अशी ग्वाही दिली. आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मराठा समाज संघटनांचे प्रतिनिधी भाई परब, सुशील सावंत यांच्यासह डॉ.विद्याधर तायशेटे, पत्रकार अशोक करंबेळकर, राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक, मनसे नेते परशुराम उपरकर, नगरसेवक कन्हैया पारकर आदींनी पुतळा स्थलांतराबाबत आपली मते मांडली.
सर्व लोकप्रतिनिधी आणि मराठा समाज संघटना पदाधिकार्‍यांची मते ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, छत्रपतींचा पुतळा हा कायदेशीर बाबी पूर्ण करूनच स्थलांतर करायला हवा. पुतळा स्थलांतराबाबत गेली तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता एक महिना थांबा मी सर्वांना अपेक्षित असा निर्णय घेऊन. पुतळा स्थलांतराबाबत दोन जागा सुचविण्यात आलेल्या आहेत. या जागा बांधकाम खात्याच्या नावे आहेत. शासनाच्या अध्यादेशानुसार बांधकामच्या जागेत पुतळा उभारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही जागा नगरपंचायतीकडे हस्तांतर करण्याबाबतची कार्यवाही सुरू करू. नगरपंचायतीनेही तसा प्रस्ताव द्यावा. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आहे. या बैठकीपासूनच पुतळा स्थलांतराबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू करतोय अशी ग्वाही पालकमंत्री श्री.सामंत यांनी दिली.