निगुडे गावातील विद्युत पुरवठा अखेर सुरळीत…

4
2
Google search engine
Google search engine

बांदा, ता. २५ : काल झालेल्या अवकाळी व वादळी पावसात विज पडल्याने निगुडे गावाला वीजपुरवठा करणारा मुख्य ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला. यामुळे निगुडे गाव रात्रभर काळोखात राहिला. आज दिवसभरात कुडाळ येथून नवीन ट्रान्सफॉर्मर मागवून बसविण्यात आल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला.
निगुडे परिसराला काल मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट सुरू असल्याने निगुडे गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या ६३ केवी ट्रान्सफॉर्मरवर वीज पडली. यामुळे ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला. काल संपूर्ण दिवस व रात्रभर गाव अंधारात राहीला परंतु ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत नसल्याने निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री भुरे व बांदा शाखा अभियंता अनिल यादव यांची भेट घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी सांगितले.
इलेक्ट्रिक ठेकेदार एस. एस. परब यांना बोलावून रात्री कुडाळ वरून नवीन ट्रान्सफॉर्मर मागविण्यात आला. आज सकाळी ९ वाजता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. नवीन बसवण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर हा १०० केवीचा आहे. यावेळी ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. तसेच उपकार्यकारी अभियंता श्री भुरे, बांदा शाखा अभियंता अनिल यादव, ठेकेदार सुरेश परब, विद्युत कर्मचारी श्री कुडव, इन्सुली पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण राणे, सावंतवाडी शहर विद्युत लाईनमन चंद्रकांत निगुडकर यांनी यावेळी सहकार्य केले.