सर्वांभूती ईश्वराचे रूप पाहून प्रेमपूर्ण जीवन जगावे…

3
2
Google search engine
Google search engine

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज; ७४ व्या वार्षिक निरंकारी संत समागम कार्यक्रमास प्रारंभ…

वेंगुर्ले, ता.२८: ‘‘ईश्वराने ही सृष्टी आणि मनुष्याची निर्मिती केवळ प्रेमासाठी केलेली आहे. सर्वांभूती ईश्वराचे रूप पाहून प्रेमपूर्ण जीवन जगणे हेच मानवी जीवनाचे मुख्य लक्ष्य आहे, असे उदगार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी मिशनच्या तीन दिवसीय व्हर्च्युअल ७४ व्या वार्षिक निरंकारी सन्त समागमाच्या शुभारंभ प्रसंगी मानवतेच्या नावे प्रेषित केलेल्या आपल्या संदेशामध्ये व्यक्त केले. हरियाणातील समालखा आणि गन्नौर दरम्यान असलेल्या जी.टी.रोड वर स्थित संत निरंकारी आध्यात्मिक स्थळावरून या संत समागमाचे थेट प्रसारण करण्यात येत आहे. समागमाचा आनंद भारत तसेच विदेशांमध्ये राहत असलेल्या लाखों निरंकारी भक्तांकडून तसेच प्रभुप्रेमी सज्जनांद्वारे मिशनच्या वेबसाईटवर तसेच साधना टी.वी. चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की कोरोनाने मानवाला आपल्या दैनंदिन जीवनात नि:स्वार्थ भावाने एकमेकावर विश्वास ठेवायला शिकवले. आपण सर्वांमध्ये या ईश्वराला पाहून एकमेकाचा आदर करावा, नर सेवा, नारायण सेवा हा भाव बाळगावा हाच तर परम धर्म आहे. ईश्वराने आपल्याला जो निसर्गरुपी अनमोल ठेवा दिलेला आहे त्याचा आपण सदुपयोग करायला हवा. ईश्वराला जाणून त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आनंदाची अवस्था प्राप्त होते. या धरतीवर आपण जन्म घेतला आहे तेव्हा या धरतीवरुन जेव्हा प्रस्थान करु तेव्हा या धरतीला आहे त्या स्थितीपेक्षा सुंदर रुप देऊन जाण्याची जाणीव ठेवायला हवी. जर सामाजिक रूपात पहायचे झाले तर आपण केवळ सह-अस्तित्वाच्या भावनेनेच नव्हे तर शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने जीवन जगण्याची आवश्यकता आहे. तत्पूर्वी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे समागम स्थळावर आगमन होताच संत निरंकारी मंडळ आणि केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाच्या वरिष्ठ सदस्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.