सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीचा अखेर फॉर्म्युला ठरला…

3
2
Google search engine
Google search engine

जागा वाटप जाहीर; शिवसेनेला आठ तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी पाच जागा…

ओरोस,ता.११: सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी कडून जागा वाटपाची घोषणा करण्यात आली. यात शिवसेनेला आठ, राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी पाच तर अपक्ष उमेदवाराला एक असा जागावाटपाचा फार्मुला ठरविण्यात आला. दरम्यान विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सुशांत नाईक यांचे मतदारसंघ अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेवर अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबतची माहिती आयोजित पत्रकार परिषद खासदार विनायक राऊत यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सावंत, उमेदवार व्हिक्टर डांटस, प्रवीण भोसले, विकास सावंत, दिगंबर पाटील, विद्याप्रसाद बांदेकर, विलास गावडे, गणपत देसाई, सुशांत नाईक, लक्ष्मण आंगणे, एम के गावडे, विनोद मर्गज, आनारोजीन लोबो, नीता राणे, आत्माराम ओटवणेकर, मनीष पारकर, मेघनाथ धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार विनायक राऊत यांनी सतीश सावंत यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा बँक निवडणूक लढवीत आहोत. सतीश सावंत कोण ? असे २०१९ मध्ये विचारणारे लोक आता घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सतीश सावंत यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे, असा आरोप विरोधकांवर केला. महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल. कै शिवरामभाऊ जाधव यांचा वारसा सतीश सावंत चालवत आहेत. ते कुठेही इकडे-तिकडे जाणार नाहीत. विरोधक त्यांच्यात व शिवसेनेत वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु तसे काही होणार नाही. आमचे सर्व उमेदवार तगडे व सहकाराची जाण असलेले आहेत. सावंतवाडी मतदार संघ उमेदवारी जाहीर न करण्यामागे विशेष कारण नसल्याचेही यावेळी मंत्री सामंत म्हणाले.