विजयकुमार आणि पद्मा फातर्पेकरांचा १८ डिसेंबरला समाज साहित्य संमेलनात होणार गौरव…

3
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१३: ‘दशावतार आणि यक्षगान’ या लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. विजयकुमार फातर्पेकर आणि सिंधुदुर्गातील ज्येष्ठ लेखिका पद्मा फातर्पेकर यांचा त्यांच्या क्षेत्रातील आजवरच्या योगदानाची दखल घेऊन शनिवार १८ डिसेंबरला सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य संमेलनात गौरव करण्यात येणार आहे.

‘समाज असतो म्हणून साहित्य असतं’ हा प्रबोधन विचार घेऊन समाज साहित्य संघटना तळकोकणात कार्यरत आहे. १८ डिसेंबर मला सायं. ५.३० वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली आणि कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सेझ विरोधी लढ्याच्या नेत्या उल्का महाजन आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याचवेळी फातर्पेकर दांपत्याच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

पन्नास वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात वावरताना प्रा. फातर्पेकर

यांनी आपल्यातील सौजन्य कधीही हरवू दिलं नाही. सतत समतेचा आग्रह धरणाऱ्या या कलावंताने लोकशाहीला बाधिकार ठरणाऱ्या घटनांच्या विरोधातही सोशल मीडियातून प्रबोधन केले. कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोककलेचे पितामह डॉ शिवराम कारंथ यांच्या सहवासात चौदा वर्ष राहून त्यांनी ‘यक्षगान’ या लोककलेचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ‘यक्षगान आणि तळकोकणातील दशावतार’ या लोककलेतील साम्यस्थळे ओळखून दशावतर लोककला अधिकाधिक विकसित होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यासाठी दशावतार नाट्य मंडळाचे सल्लागार म्हणून कार्यरत राहताना त्यांनी दशावतार लोककलेच्या दिग्गज अभ्यासकांपर्यंत पोहचवलाच परंतु महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही विविध चर्चासत्रात सहभागी होऊन दशावताराबाबत महत्त्व अधोरेखित केले.

पद्माताई फातर्पेकर या कोकणातील ज्येष्ठ लेखिका कवयित्री. विशेषता मुलांसाठी त्यांनी कविता, श्रुतिका, एकांकिका आदीचे लेखन केले. या लेखनाचे त्यांनी सातत्याने आकाशवाणीवर सादरीकरणही केले. ऐलमा पैलमा आणि इतर एकांकिका, दोन एकांकिका, औट घटकेच राज्य आदी एकांकिका संग्रह त्यांचे प्रसिद्ध असून त्यांना राज्य शासनाच्या साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या सगळ्या कामाची दखल घेऊन समाज साहित्य संघटनेतर्फे त्यांचा हा गौरव करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी मधुकर मातोंडकर (९४२३५१३०७२) यांच्याशी संपर्क साधावा.