बांद्यात पाहायला मिळाली खाकी पलीकडची “भूतदया”…

5
2
Google search engine
Google search engine

अपघातात जखमी माकडाचे महिला पोलिसाने वाचविले प्राण…

बांदा,ता.२८: मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या माकडाचे प्राण त्याठिकाणी कार्यरत असलेल्या बांदा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी ज्योती हरमलकर यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले. वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणाबदल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. हरमलकर यांच्या सेवाभावी वृत्तीने खकितील माणुसकीचे दर्शन घडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सायंकाळी महामार्गावर अज्ञात वाहनाने माकडांच्या कळपाला धडक दिली. यामध्ये माकडाचे पिल्लू गंभीर जखमी झाले. रस्त्यावर विव्हळणाऱ्या या माकडाच्या पिल्लाला पोलीस कर्मचारी हरमलकर यांनी पाणी पाजून रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवले. याची कल्पना त्यांनी वनविभागाला दिली, मात्र तब्बल दोन तास याठिकाणी कोणीही फिरकले नाही. त्यांनी प्राणीमित्र संघटनेचे आनंद बांबर्डेकर यांना याची कल्पना दिली. त्यांच्या साहाय्याने त्यांनी माकडाच्या पिल्लाला तात्काळ सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयात नेले, मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी प्राणीमित्र नाविद हेरेकर उपस्थित होते.

हरमलकर यांनीच पिल्लावर प्राथमिक उपचार केलेत. पिल्लाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. काल गुरुवारी सायंकाळी देखील पोलीस ठाण्याच्या खाली शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या माकडाला त्यांनी जीवदान दिले आहे. हरमलकर या प्राणीमित्र असून कित्येकदा रात्री त्यांनी बांदा शहरातील भुकेलेल्या कुत्र्यांना देखील जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.