निरवडेतील भूतनाथ कला क्रीडा मंडळाचा अनोखा आदर्श…

2
2
Google search engine
Google search engine

क्रिकेट स्पर्धेतून जमवली रक्कम; गरजू रुग्णांच्या उपचारात “खारीचा वाटा”…

सावंतवाडी ता.०१: क्रिकेट स्पर्धा भरवण्यामागे तरुणाईचं वेगळे “इंन्टेशन” असतं परंतु या सर्व प्रकारांना फाटा फोडून निरवडे येथील भूतनाथ कला क्रीडा मंडळाने समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जमलेली रक्कम असाध्य आजाराने त्रासलेल्या तृप्ती बांदिवडेकर व सुयोग मुळीक या गावातील दोन गरजू रुग्णांना देऊन त्यांच्या उपचारासाठी “खारीचा वाटा” उचलला आहे. दरम्यान इतरही दात्यांनी या दोघांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केले आहे.
निरवडे येथील तृप्ती बांदिवडेकर तिच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी तब्बल बारा लाख इतका खर्च येणार आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून भूतनाथ कला-क्रीडा मंडळाने ही मदत दिली. तर सुयोग मुळीक हा बारा वर्षीय मुलगा ब्लड कॅन्सर आजाराने ग्रासला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचारासाठी मदतीची गरज होती. त्यामुळे त्यालाही या मदतीचा लाभ देण्यात आला.
भूतनाथ कला-क्रीडा मंडळाच्या वतीने निरवडे येथे या दोघांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धा भरवली होती. त्यातून जमलेल्या रकमेतून ही मदत या दोघा गरजू रुग्णांना उपचारासाठी “खारीचा वाटा” म्हणून देण्यात आली.तसेच या स्पर्धेसाठी लाभलेले पंच नारायण चव्हाण,उदय आंबोलकर,श्री पेडणेकर, बाप्पा तानावडे,सतीश वारंग,शरद बांदिवडेकर, महेंद्र गावडे  आदींनी आपले मानधन सुद्धा संबंधितांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.