प्रश्न सुटत नसेल तर आंबोली-गेळेतील ग्रामस्थांनी जमिनी ताब्यात घ्याव्यात…

1
2
Google search engine
Google search engine

 

राजन तेलींचे आवाहन; पुढचे काय ते आम्ही बघू, प्रशासनाने डिवचण्याचा प्रयत्न करू नये..

सावंतवाडी,ता.१५:आंबोली-गेळे कबूलायतदार गावकर प्रश्न सुटत नसेल, तर आता ग्रामस्थांनीच स्वतः आपल्या जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात करावी, होणाऱ्या कारवाईला आम्ही सामोरे जाऊ, असा सज्जड इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला. दरम्यान हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आता सरकारला सुद्धा न्यायालयात खेचायची तयारी आम्ही ठेवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुद्धा आपला न्याय-हक्कासाठीचा लढा कायम ठेवावा, त्यासाठी पोलिसांनी सौजन्याची भूमिका घेऊन त्यांना सहकार्य करावे, आंदोलनकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील प्रांतकार्यालयासमोर सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रमुख गावकर शशिकांत गावडे, रामचंद्र गावडे, राजेंद्र गावडे, शंकर गावडे, प्रकाश गावडे, आंबोली सरपंच गजानन पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, विलास गावडे, अमित परब, सुधीर आडिवरेकर, अंकुष गवस, अंकुश कदम, गेळे उपसरपंच श्रीधर गवस, राजेश गावडे, सखाराम गवस, महादेव गावडे, परशुराम पेंडसे, राजन नाईक, सुनील नार्वेकर, रोहन कोंडेकर, नारायण कोरगावकर, सखाराम नार्वेकर, नागेश नार्वेकर, सचिन कोरगावकर, धोंडी बंड, शंकर सावंत, नारायण कुडतरकर, अनंत गवडे, संतोष गावडे, विलास गावडे, दशरथ गवस, आनंद गावडे, विठ्ठल गावडे, नामदेव गावडे, विजय गावडे, नवसु गवडे, सिताराम गावडे, विठू जंगले, देऊ जंगले आदींसह शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. तेली पुढे म्हणाले, आंबोली-गेळे कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे ग्रामस्थ शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. मात्र येथील स्थानिक आमदारांना तो प्रश्न सोडविण्यास अद्याप यश आलेले नाही. भाजप सरकारच्या काळात हा प्रश्न अंतिम टप्प्यात आला होता. मात्र आमदार दीपक केसरकर यांच्या हट्टापायी तो पुन्हा रखडला. हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन केसरकर फक्त राजकीय श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता सुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनीच पुढाकार घ्यावा, आपल्या जमिनी स्वतः ताब्यात घेण्यास सुरुवात करावी. तुम्ही थेट तुमच्या जमिनी कसायला सुरुवात करा, कोणी विरोध केल्यास त्याला आम्ही भाजपाचे कार्यकर्ते सामोरे जाऊ, मात्र आता माघार नको, असा विश्वास देत वेळ प्रसंगी आम्ही सरकारला सुद्धा न्यायालयात खेचण्याची तयारी ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.तेली पुढे म्हणाले, आंदोलनादरम्यान पोलिसांकडून ग्रामस्थांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. त्यांना घोषणा देता येणार नाही, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, अशी भीती दाखविण्यात आली. त्यामुळे याबाबत आपण नाराजी व्यक्त करीत आहोत. या ठिकाणी आंदोलनकर्ते आपल्या न्याय हक्कासाठी आले आहेत. त्यांना अशी भीती दाखवणे चुकीचे आहे. ते लोकशाही पद्धतीने आपला हक्क मागत आहेत. ते अतिरेकी किंवा अवैध धंदेवाले नाहीत, त्यामुळे पोलिसांनीच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, आंदोलनकर्त्यांशी सौजन्याने वागावे, असे त्यांनी सांगितले.