सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायिकांना करात सूट द्या…

3
2
Google search engine
Google search engine

जिल्हा राष्ट्रवादीची मागणी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडे निवेदन सादर…

कुडाळ,ता.२९: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे-मोठे पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना राज्य सरकारने करात सवलत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. याबाबत काल सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या श्री. ठाकरे यांना त्यांनी निवेदन दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षित होऊ लागले. याच आधारे जिल्ह्यातील स्थानिक भूमीपूत्रानी पर्यटनावर आधारित लहान मोठे व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी खाजगी,सहकारी,राष्ट्रीय बॅंका कडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आणि नैसर्गिक संकटामुळे हा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडला, देश विदेशातील पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतानाच कोरोना महामारीचे महाभयंकर संकट जगासह आपल्या देशात आले. आणि पर्यटन व्यवसाय व पर्यटन व्यावसायिक पूर्णतःआर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे नुकतीच उभारी घेऊ पाहणारे व्यवसायिक मेटाकुटीस आले आहेत. त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटन व्यवसायिकांना आकारण्यात येणाऱ्या करा मध्ये सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे, आशिफ शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, इफ्तिकार राजगुरू आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. ठाकरे यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.