मालवण पालिकेकडून आणखी १२ मालमत्ता सील…

3
2
Google search engine
Google search engine

७ नळ कनेक्शनही तोडली ; पालिकेच्या कर आणि पुरवठा विभागाची कारवाई…

मालवण,ता.१: शहरात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीदारांना पालिकेच्या करवसुली कर्मचाऱ्यांनी दणका दिला आहे. पाणी पुरवठा विभागाने शहरातील ७ जणांची नळ कनेक्शन बंद केली. तर कर विभागाने काही जणांच्या मालमत्ता सील केल्या आहेत.

शहरामध्‍ये मालमत्‍ताधारकांनी मालमत्‍ता कर व पाणीपट्टी कर थकवल्‍याने पालिकेच्यावतीने जप्‍तीची कारवाई अधिक तीव्र करण्‍यात आली आहे. शिवाजी फाटक, अथर्व रेसिडेन्सी, सिद्धीविनायक बिच रिसॉर्ट प्रा.लि. अशा शहरातील अजून १२ मालमत्‍ता सील करण्‍यात आल्‍याचे पालिकेकडून सांगण्‍यात आले. जप्तीची हि कारवाई जप्ती पथक प्रमुख गितांजली नाईक आणि विजय रावले, राजा केरीपाळे, बस्त्याव फर्नाडीस, सुनील चव्हाण, जीवन जोगी, सचिन कासले, राकेश नरे, लुब्ना खान यांच्या पथकाने केली. हि कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जप्तीची हि मोहीम एप्रिलमध्येही सुरू राहणार असून वर्षानुवर्षे थकीत असणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कर निरीक्षक गितांजली नाईक यांनी दिली. थकीत मालमत्ता कर भरून घेण्यासाठी पालिकेचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.

गेल्या आठवड्यात पालिकेच्या कर विभागाकडून शहरातील २४ मालमत्ता सील करण्यात आल्या होत्या. यापूर्वीच पालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागाकडून १० हजारहून अधीकचा कर थकविणाऱ्या २०० मालमत्‍ता धारकांना मालमत्‍ता जप्‍तीची नोटीस पाठवण्‍यात आली आहे. हा कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल अशी नोटीस त्यांनी संबंधित थकबाकीदारांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मालमत्ता सील करण्यात आल्या असून पुढे हि कारवाई सुरुच राहणार असल्याचे श्रीमती नाईक यांनी सांगितले.

मालमत्ता व पाणीपटटी कर थकबाकी ठेवलेल्या मालमत्ता धारकाकडे जाऊन तो कर भरुन घेण्यासाठी पालिकेच्या वतीने चार वसुली पथक तयार केले असून ही फिरती पथके थकबाकीदारांपर्यंत पोहचून त्यांच्याकडून कर वसुली करुन घेत आहेत. उर्वरित कर जमा करण्यासाठी पालिकेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. आर्थिक वर्ष संपत आले असताना मालमत्ताधारक स्वत:हून मालमत्ता कर भरणा करत नसल्याने पथके स्थापन करुन त्याव्दारे हा कर वसूल केला जात आहे.