शिवसेनेने पारंपरिक मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले…

1
2
Google search engine
Google search engine

अमित इब्रामपूरकर ; शासनाने दिलेली गस्तीनौका बंद का…?

मालवण,ता.०६: पारंपरिक मच्छिमारांना त्रास देण्याचे काम शिवसेना पद्धतशीरपणे करत आले आहे. एलईडी दिव्यांनी होणारी मासेमारी तसेच शासनाच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी असलेली गस्तीनौका बंद आहे. ती सुरू होण्यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत नाहीत. पालकमंत्री उदय सामंत पर्ससिन धारकांच्या कार्यालयाचे उद्घाटन करतात म्हणजे उघडपणे पारंपरिक मच्छिमारांना वार्‍यावर सोडण्याचे काम शिवसेना करत असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

पालकमंत्री उदय सामंत किनारपट्टी भागात फिरकत देखील नाहीत. त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणासाठी शिवसेना पारंपरिक मच्छिमारांचा वापर करत आहे. भाड्याने गस्तीनौका आणली म्हणून शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला. मग आज सत्तेत असताना शासनाने दिलेली गस्तीनौका अजून बंद का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

किनाऱ्यावर येणारी चक्रीवादळे, कोरोनाचे निर्बंध, घटणारे मत्स्योत्पादन यामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे. डिझेल परताव्याची रक्कमही मिळाली नाही. डिझेल परताव्यासाठी शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचे लेखा परीक्षण करणाऱ्या लेखा परीक्षकाने १२० व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती असलेल्या नौकामालकांचा डिझेल परतावा (कर परतावा) देऊ नये, असा ऑडिट दोष काढल्यामुळे नौका मालकांना मिळणारा डिझेल प्रतिपूर्ती परतावा रोखण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचे हितसंबंध पर्ससिनधारकांशी सलोख्याचे असल्यानेच लेखा परीक्षण करून पारंपरिक मच्छिमारांना त्रास देण्याचे काम शिवसेना करत आहे असा आरोप श्री. इब्रामपूरकर यांनी केला आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर किनारपट्टी भागात वारंवार होणार्‍या चक्रीवादळामुळे कायमस्वरूपी उपाय म्हणून भूमिगत वीजवाहिन्या, धूपप्रतिबंध बंधारे, शेल्टर हाऊस बांधणार असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते त्याचे पुढे काय झाले ? केवळ घोषणा करणे आणि पारंपरिक मच्छिमारांना वार्‍यावर सोडणे हेच काम शिवसेना करत असल्याचेही श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.