अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात नेईपर्यंत “सीपीआर” सपोर्ट महत्वाचा…

3
2
Google search engine
Google search engine

प्रवीण सुलोकर; कसाल येथे वाहतूक पोलिसांसाठी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ कार्यशाळा संपन्न…

ओरोस,ता.१२: कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात नेईपर्यंत “सीपीआर” चा सपोर्ट महत्वाचा असतो. त्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांनी दिली. कसाल येथील ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ कार्यक्रमात ते बोलत होते.

रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांचा सामना नेहमीच वाहतूक पोलीसांना करावा लागतो. त्यांना प्रथमोपचार व ह्रदयक्रिया बंद पडल्यावर द्यायचा सी पी आर माहीत असणे आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या पुढाकाराने येथील कोलते हाॅस्पिटल कसाल मध्ये वाहतूक पोलिसांसाठी ‘बेसिक लाईफ सपोर्ट ‘ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये 25 जिल्हा वाहतूक पोलीसांनी सहभाग घेतला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे सदस्य व ट्रेनर प्रविण सुलोकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष डाॅ.प्रशांत कोलते, पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक अनिल व्हटकर उपस्थित होते.

अपघात प्रसंगी व्यक्तींना वेळीच गांभीर्य ओळखून सीपीआर कसा द्यायचा यांचे प्रात्यक्षिक प्रविण सुलोकर यांनी यावेळी दाखविले. हाॅस्पिटलला नेईपर्यंत सीपीआर सारख्या प्रकारचा सपोर्ट अनेक रूग्णांचे प्राण वाचवू शकतो, असे ते यावेळी म्हणाले. अशा प्रकारची महत्वाची कार्यशाळा घेतल्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेकडून रोटरीचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाच्या प्रत्येक वाहनांमध्ये प्रथमोपचारचे कीट रोटरीकडून देणार असल्याचे रोटरीयन डॉ.प्रशांत कोलते यांनी सांगितले.