अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी कोल्हापुरातील एकाला १० वर्षे सश्रम कारावास…

2
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.१०: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी कोल्हापूर- गगनबावडा येथील एकाला जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सुनील शिवाजी पाटील, असे त्याचे नाव आहे. विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी ही शिक्षा सुनावली असून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.

गगनबावडा येथील सुनील पाटील याने जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच घरच्यांची बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलगी आरोपी सोबत आढळून आली होती. तसेच पुढील तपासात तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे संशयित आरोपी सुनील याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीचे वडील, पीडित मुलगी, हॉटेल मालक यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुनील याला भादवी कलम ३७६(२)(N) अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने जादा कैद, ३६३ अंतर्गत २ वर्षे सक्त मजुरी आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, ५०६ अंतर्गत १ वर्ष सक्त मजुरी तर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ अंतर्गत १० वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच ही शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक जे .के. पाटील तपास केला होता.