वायरी-गर्देरोड येथे सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला…

5
2
Google search engine
Google search engine

पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद ; पोलीस तपास सुरू…

मालवण,ता.०३: येथील वायरी गर्देरोड मार्गावर असलेल्या एका बंद घराच्या बाहेरील ओट्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या स्थितीत दिसून आला आहे. याबाबत पोलिसांकडूनअधिक तपास सुरू आहे.

या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे, विलास टेंबुलकर हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या स्थितीत होता तसेच सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.

माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, संमेश परब, संतोष लुडबे, तृप्ती मयेकर, जयमाला मयेकर, ढोले बाबू यासह स्थानिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. ढोले बाबू, राजू वराडकर व सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र त्या ठिकाणी कोल्ड स्टोअरेज व्यवस्था बंद असल्याने शवविच्छेदन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सापडलेला मृतदेह अनोळखी व्यक्तीचा सुमारे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील आहे. मृतदेहाला १५ दिवस कालावधी उलटला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मृतदेहाचा काही भाग कुत्र्यांनी खाल्ला होता. मृत्यू झालेली व्यक्ती त्या ठिकाणी झोपायला येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान परिसरातील कोणीही व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नाही. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृतदेह उचलण्यासाठी येथील पालिकेला संपर्क केला असता कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला असता मृतदेह ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज व्यवस्था बंद असल्याने माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.