विनायक राऊतांना राज्यसभेवर पाठविण्याचा एकमुखी ठराव…

1080
2
Google search engine
Google search engine

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय; पराभवाने खचून जाऊ नका, कार्यकर्त्यांना आवाहन…

सावंतवाडी,ता.१४: माजी खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात केलेले काम लक्षात घेता येणाऱ्या काळात त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय वजा ठराव आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान पराभवाच्या नैराश्यातून येथील कार्यकर्त्यांनी न राहता येणाऱ्या काळात इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत-जास्त मतदान व्हावे यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन उपस्थित नेत्यांकडून करण्यात आले.

इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील आदिनारायण मंगल कार्यालयात झाली. यावेळी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, अतुल रावराणे, बाळा गावडे, मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक जानवी सावंत,  उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, भारती कासार, श्रुतिका दळवी, रश्मी माळवदे, रमेश गावकर, समीर वंजारी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. राऊत म्हणाले, सावंतवाडी कोकण रेल्वे टर्मिनसचा प्रश्न अजून बाकी आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिसला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देणे बाकी आहे. भविष्यात अनेक कामे करायची आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून जाऊ नये, मदमस्त सत्ताधाऱ्यांना इंडिया आघाडीने देशात आणि राज्यात रोखले असून भविष्यात प्रत्येक निवडणूक इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढून आपण जिंकू. आमची भिस्त कर्तृत्वावर, कार्यकर्त्यांवर आहे. कार्यकर्त्यांवर विश्वास आहे मात्र विरोधकांचा विश्वास पैशावर आहे. पैशावर हा पराभव नाही तर पैशावर मात करून बाहेरचावाडा या भागामध्ये मतदारांनी दाखवून दिले की देशाची गरज काय आहे. देशाला प्राधान्य देऊन त्यांनी इंडिया आघाडीला मतदान केल्याचे स्पष्ट झाले. पैसाही तिथे गेला होता मात्र मतदार ठाम राहिला. यापुढेही असे कार्यकर्ते आणि मतदार निर्माण करण्याची गरज आहे असे मत त्यांनी या बैठकीमध्ये व्यक्त केले.

आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले, कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करून केलेल्या चुकांची दुरुस्ती करून आगामी निवडणुकांना सामोरे जाऊया असे आवाहन केले व विनायक राऊत यांना राज्यसभेत पाठवण्याचा एकमुखी ठराव व्हावा अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना महिलांना मानसन्मान दिला अशा व्यक्तीला राज्यसभेवर पाठवणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी काही जण पैशाला भुलले म्हणून इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला परंतु लोकांच्या मनातले खासदार हे विनायक राऊतच असल्याचे सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हा विकत आणलेला चषक असून घराघरात पैसे दिले गेले म्हणून हा विजयचा चषक प्राप्त झाला अशी टीका केली, तर ही निवडणूक म्हणजे चार मंत्र्यांविरुद्धचा लढा होता. असे सांगून उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांना राज्यसभेवर घेऊन कोकणला बळ द्यावे असे आवाहन केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी यापुढे इंडिया आघाडीचे नेते राऊत राहतील त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवार जाहीर करावेत एकत्र येऊन काम करूया असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली, ते म्हणाले मंत्री म्हणून काय काम करायचे हे मी दाखवून दिले आहे. मात्र एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मंत्री पंधरा वर्षात उभे करू शकलेले नाहीत असा टोला लगावला. या बैठकीचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मानले.