शामसुंदर धुरींचा बांधकामला इशारा; प्रशासनाच्या विरोधात व्यक्त केली नाराजी…
बांदा,ता.२८: वाफोली मार्गावरील रस्ते खड्डे बुजवण्यात यावेत यासाठी उद्या रस्त्यावर बसून आंदोलन करू, असा इशारा तेथील सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी दिला आहे. गेली अनेक महिने वारंवार लक्ष वेधून सुद्धा त्या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे ते निर्णयावर ठाम आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्ध दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, बांदा-वाफोली मार्गावरील गडगेवाडी येथील वनविभाग चौकी ते इंडन गॅस सेंटर पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना पादचारी व वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होत आहे. तसेच रस्त्यालगत असलेले गटारही उघडेच असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा व उघडी गटारे बंदिस्त करा, अन्यथा उद्यापर्यंत हे काम सुरु न झाल्यास रस्त्यावर बसून आंदोलन करू, असा इशारा श्री. धुरी यांनी दिला आहे.