महिन्याभरात जनावरांवरील हल्ले वाढले; ग्रामस्थांचा दावा…
आंबोली ता.२९: पंचक्रोशीत वाघाची दहशत कायम असून पुन्हा एकदा त्याने गाईचा फडशा पडला आहे. ही घटना काल दुपारी घडली. संबंधित गाय महेश जानू पाटील यांच्या मालकीची होती. याबाबतची माहिती श्री.पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान या महिन्यात परिसरातील जनावरांवर वाघाचे हल्ले वाढले आहेत, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित गाय काल दुपारी वाघाच्या भक्ष्यस्थानी सापडली. तिच्या शरीराचा अर्धा भाग वाघाने फस्त केला आहे. तर शुक्रवारी वाघाने श्री.राऊत यांच्या म्हैशीचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच हा दुसरा प्रकार काल उघडकीस आला. दरम्यान या महिन्यात वाघाकडून जनावरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे, असा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर श्री.पाटील यांनी आपली गाय वाघाने मारल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अधिकारी-कर्मचारी पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.