सावंतवाडीतील मोती तलावाचा कठडा कोसळण्यास प्रशासन जबाबदार…

4
2
Google search engine
Google search engine

अनिल केसरकर; चुकीच्या पद्धतीने गाळ काढल्यामुळे प्रकार, तात्काळ दुरुस्ती करा…

सावंतवाडी,ता.२४: येथील मोती तलावातील गाळ काढण्याची पद्धत पुर्णतः चुकीची होती. त्यासाठी मनसेने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता. त्यामुळे तलावाची संरक्षक भिंत कोसळण्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर यांनी केला आहे. दरम्यान कोसळलेल्या कठड्याचा फटका शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला बसू शकतो. त्यामुळे संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांनी त्याठिकाणी तात्काळ कार्यवाही करून कठड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत श्री. केसरकर यांनी प्रसिद्धीपत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, मोती तलावातील गाळ काढण्याची पद्दत चुकीची असून त्यामुळे भविष्यात तलावाच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होईल, अशी भीती सर्वप्रथम मनसेने व्यक्त केली होती. डोजर रस्त्यावर ठेवून चालू असलेले गाळ काढण्याचे काम त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणीही मनसे मार्फत प्रशासनाकडे आम्ही केली होती. यावेळी काम तात्काळ बंद करण्यात आले. मात्र ज्या ठिकाणचा गाळ काढला होता त्या ठिकाणचा संरक्षक कठडा कमकवूत झाला होता. व तो पावसात कोसळण्याची भीती होती. ती खरी ठरली आहे. हा संरक्षक कठडा कोसळल्याने भविष्यात मुख्य रस्त्याला देखील आता भिती निर्माण झाली असून यावर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना करावी, भविष्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता बंद झाला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मनसेतर्फे त्यांनी दिला आहे.