शिवसेना शिंदे गटाशी युती करून सर्व निवडणुका लढविणार…

9
2
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार ; मंत्रिपद न मिळाल्‍याने सिंधुदुर्गात कुणीही नाराज नाही…

कणकवली,ता.०९: बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती आता झालेली आहे. या युतीच्याच माध्यमातून जिल्‍हा परिषद, पंचायत समितीसह पुढील सर्व निवडणुका लढविणार आहोत. तसेच सिंधुदुर्गातील भाजप आमदारांना मंत्रिपद न मिळाल्‍याने कुणीही नाराज नाही, असे प्रतिपादन भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी आज येथे केले.
येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत, जिल्‍हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.
श्री.जठार म्‍हणाले, सिंधुदुर्गचा होणारा पालकमंत्री हा शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप युतीचाच असणार आहे. सध्या १८ मंत्र्यांचा शपथविधी झालाय तर आणखी पंधरा दिवसानंतर आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी होईल. तसेच विधान परिषदेवर १२ आमदार निवडून जाणार आहेत. तसेच महामंडळाच्याही नियुक्‍त्‍या होणार असून यात सर्वांना न्याय मिळेल असा विश्‍वास आहे.
शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांच्यात कोणतेही वाद नाहीत. तसेच मंत्रिपद न मिळाल्‍याने कुणीही नाराज नाहीत. पालकमंत्री ठरविण्याचे अधिकार आम्‍हाला नाहीत. जो पालकमंत्री होईल तो युतीचाच असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मुद्दयांवर तोडगा काढतील असाही विश्‍वास श्री.जठार यांनी व्यक्‍त केला.