संघर्ष करुन आमदारकी मिळवली, मात्र आयुष्यात कधीही बंडखोरी केली नाही…

5
2
Google search engine
Google search engine

दिपक केसरकर;आत्तापर्यंतची लढाई तत्वासाठी,मात्र शिवसेना हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा नाही….

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१३: “मी”आयुष्यात कधीही बंडखोरी केली नाही. त्यामुळे मी तब्बल तीन वेळा आमदार होवू शकलो. जो काही निर्णय घेतला तो तत्वासाठी घेतला. मी अन्याय सहन केला नाही.आयुष्यात नेहमी यशस्वी झालो.असे असताना संघर्ष करुन मी आमदार बनल्यानंतर मला दिलेले आश्वासन पाळले नाही.त्यामुळे माझी पुढची भूमिका ठरली.मात्र मी शिवसेना आणि हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा करणार नाही. असा शब्द आज येथे आयोजित मेळाव्यात कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी दिला आहे.
मला मिळालेल्या मंत्रीपदाचा वापर हा जिल्ह्याच्या नव्हे तर कोकणच्या विकासासाठी करणार आहे. येथील शेतकरी, मच्छीमारांचा कायापालट करण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले.कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत आलेल्या श्री केसरकर यांचा सर्वपक्षीयांकडुन नागरी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या प्रमाणात पाउस असून सुध्दा त्या ठीकाणी नागरीकांनी भिजत या सभेला उपस्थिती दर्शविली.यावेळी श्री केसरकर यांचा सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले व गोव्याचे सुपूत्र तथा माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, राजन पोकळे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नागरिक सत्कार समितीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पणदूरकर, विश्वास घाग,सचिन वालावलकर, प्रकाश बिद्रे, गणेशप्रसाद गवस, सुरेंद्र बांदेकर, अभिषेक मेस्त्री, राजेंद्र निंबाळकर, अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, रवींद्र परब, जालिंदर परब, दया परब, बाळा बोर्डेकर आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, विरोधक मी अनेक पक्ष बदलले अशी टीका करत आहेत. मी माझ्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. त्यावेळी सुद्धा माझे नेते शरद पवार होते. त्यानंतर काँग्रेस पक्ष विभागला जाऊन पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. मात्र मी त्यांना सोडचिट्टी देणे पसंत केले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतच मी राष्ट्रवादीत राहिलो. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे तिसऱ्या वेळी मला संधी देण्यात आली. आणि ती मी यशस्वीरीत्या पेलत राष्ट्रवादीचा आमदार झालो. त्या काळात मतदार संघाच्या विकासासाठी मी योगदान दिले. परिणामी मी पवारांच्या जवळचा आणि लाडका म्हणून ओळखला जाऊ लागलो. हेच काहींना सहन झाले नाही. त्यांनी माझ्या विरोधात कुरघोडी सुरू केली. मला पक्षाच्या अनेक कार्यक्रमात डावले जाऊ लागले. माझ्यावर होणारा हा अन्याय मी कधीच सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे भाजपात जाण्याची संधी उपलब्ध होती. तशी ऑफरही समोरून आली होती. मात्र शिवसेना हा राज्यातील संघर्ष करणारा पक्ष आहे. आणि अशा पक्षात काम करायला मला आवडेल म्हणून मी शिवसेनेसोबत गेलो. मात्र या काळात शिवसेना आणि भाजप यांच्यामधील दुवा बनून मी पुढे कार्यरत राहिलो. मी संघर्षातून आमदार बनलो आहे. मला मंत्रिपद द्यायचं नसते तर शिवसेनेने ते आधीच सांगितले पाहिजे होते. कारण आमदारकीच्या वेळी आम्हाला प्रॉपर्टी सुद्धा विकावी लागते. कुटुंबाला सुद्धा दूर ठेवावे लागते. अशातच झालेला हा अन्याय मी सहन करू शकलो नाही. त्यामुळेच भाजपाशी असलेले सलोख्याचे संबंध वापरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला. आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र मी शिवसेनेशी आणि हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, आता माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी अगदी जवळचे संबंध आहेत. त्याचा फायदा कोकणच्या आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे. येथील शेतकरी आणि मच्छीमारांचा कायापालट करण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहणार आहेत. तर माझ्या आजच्या या मेळाव्यात उपस्थित राहून भर पावसात विचार ऐकायला आपण थांबला असेच कायम पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी केले.