सावंतवाडी भाजप मधील गृहकलह उघड, संजू परबांची छबी आयत्यावेळी “कट”…

2
2
Google search engine
Google search engine

शहरात “त्या” बॅनरची चर्चा; कोणी केले माहीत नाही, दोन्ही गटाचे स्पष्टीकरण…

सावंतवाडी,ता.२०: येथील शहर भाजपाच्या संजू परब व सुधीर आडीवरेकर, परिमल नाईक यांच्या गटात सुरू असलेले शितयुध्द आज बॅनरच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त येथील एसपीके महाविद्यालयाच्या कॉर्नरवर लावण्यात आलेल्या बॅनरवर एक छबी आयत्यावेळी कट करण्यात आली. सर्व नेेत्यांचा फोटो असताना एकच फोटो कसा काय लपवला याबाबत चर्चा सुरू असताना तो फोटो माजी नगराध्यक्ष तथा भाजपा प्रवक्ते संजू परब यांचा असल्याचे काही कार्यकर्त्याकडुन सांगण्यात आले. मात्र नेमका हा प्रकार कोणी केला याबाबत दोन्ही गटांकडुन ठोस माहीती मिळाली नाही.
सावंतवाडी पालिका निवडणूकीनंतर शहरातील पदाधिकार्‍यांत दोन गट झाले आहे. यात एक गट हा माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा आहे. तर दुसरा गट माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, परिमल नाईक,उदय नाईक यांचा आहे. गेले काही दिवस पक्षाच्या अनेक कार्यक्रमात उपक्रमात हे दोन गट उघडपणे आपले शक्ती प्रदर्शन करताना दिसतात. रविद्र चव्हाण मंत्री झाल्यानंतर दोन गटांनी वेगवेगळे जावून त्यांची भेट घेतली होती. तर तत्पुर्वी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आडीवरेकर यांच्यासह अन्य सहकार्‍यांनी आपले बॅनर लावले होते. दरम्यान श्री. चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमिवर येथिल एसपीके महाविद्यालयाच्या कॉर्नरवर लावण्यात आलेला एक फलक ही अंतर्गत दुही ठळकपणे सांगून गेला. काल रात्री हे फलक त्याठीकाणी लावण्यात आले. त्या बॅनरवर मंत्री रविद्र चव्हाण यांच्यामुख्य फोटोसह संजू परब राजू बेग,नासीर शेख,मनोज नाईक,आनंद नेवगी,उत्कर्षा सासोलकर,समुध्दी विरर्नोडकर,दिपाली भालेकर अशा क्रमाने फोटो होते. तर जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक यांचे फोटो मोठे होते. परंतू आज सायंकाळी फलकातील एका फोटोवर पांढरा कागद चिकटवून तो फोटो गायब करण्यात आल्याचे चित्र होते. अनेक नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी माहीती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. दरम्यान संजू परब यांच्या जवळच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला असता बॅनरवर खाली श्री. परब यांचा फोटो होता. मात्र नेमका कोणी तो फोटो लपवला हे मात्र कळू शकले नाही, अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण श्री. परब करणार नाहीत, असे सांगण्यात आले. तर दुसर्‍या गटाच्या परिमल नाईक यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेर आहे. त्यामुळे मुळात झालेला प्रकार आणि बॅनरवर नेमका कोणाचा फोटो होता, हे आपल्याला माहीत नाही. माहीती घेवून सांगतो, असे त्यांनी सांगितले. दोन्ही गटाकडुन नेमका प्रकार काय हे सांगण्यास चालढकलपणा केला जात असल्यामुळे “त्या” गायब झालेल्या छबीची चर्चा मात्र शहरात जोरदार सुरू होती.