वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी मुले उद्याचा भारत घडवतील…

18
2
Google search engine
Google search engine

नितीन वाळके ; वराडकर हायस्कूलमध्ये संविधान अभियान कार्यक्रम…

मालवण, ता. २९ : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी मुले उद्याचा भारत घडवतील असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी कट्टा येथे केले.
संविधान निष्ठ भारतीय अभियानच्या वतीने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री. वाळके म्हणाले, राज्यघटनेमुळे माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे देताना आपल्याला अनेक मूल्य ही दिली आहेत. उद्याचा भारत घडवत असताना कित्येक वर्ष या मूल्यांची जडणघडत होत आहे. आजही ही मूल्ये जोपासण्याची तीव्र गरज निर्माण झालेली आहे. आपण चिकित्सक राहिल्यास सत्यापर्यंत पोचता येते आणि आपले ज्ञान अबाधित राहते. समाजातील विषमतेविरुद्ध आवाज उठविणे ही आपली प्रथम जबाबदारी असून भारतीय नागरिक म्हणून किंबहुना या बद्दल संवेदनशील राहणे ही आज काळाची गरज असून संसदीय मार्गाने विषमतेविरुद्ध निषेध प्रकट करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याविषयीची जागृती करण्यात आली. भारतीय संविधानामध्ये अनेक मूल्य जपली आहेत व आत्मसात केली आहेत. त्यामधीलच वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याचा आधार घेऊन आज प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना नंदकिशोर तळाशीकर यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रश्नातून उत्तर देताना वैचारिक जागृती करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांच्या समोर दाखवले. ज्या समाजामध्ये आपण राहतो. अनेक बुवाबाजी करणारे लोक रासायनिक पदार्थ वापरून लोकांना फसवतात. हाथ चलाकी च्या माध्यमातून बुवाबाजी यामुळे आपली फसवणूक कशी होते याबद्दल प्रयोगाच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी त्यांनी रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे, भूत -प्रेत याविषयी ची मानसिकता याबद्दलचे, गाडीवर बांधले जाणारे दोरे, घरावर बांधले जाणारे बाहुले, यांचा उल्लेख करत आपली असणारी अंधश्रद्धा व त्यावरील होणारे परिणाम या बद्दल माहिती देताना आपली वैज्ञानिक दृष्टी कशी जागृती ठेवली पाहिजे या बद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात भारतीय संविधान विषयीची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. त्याचबरोबर चमत्कारामधील विज्ञान, विज्ञानातून मुलांना नदी स्वच्छता, कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपला दृष्टीकोन विज्ञानवादी ठेवणे. वाचन महत्वाचे असून वाचाल तर वाचाल असा संदेश दिला. या वेळी विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा वृत्तीची जोपासना झाली व वैज्ञानिक दृष्टिकोनही वाढीस लागला. कार्यक्रमाची सांगता भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनाने व तद्नंतर राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, सचिव सुनील नाईक, सुधीर वराडकर, मुख्याध्यापक ऋषी नाईक, पर्यवेक्षिका देवयानी गावडे, विज्ञान प्रमुख महेश भाट, संजय पेंडूरकर उपस्थित होते. तसेच आशिष पेडणेकर, जेम्स फर्नाडिस, किरण वाळके, विल्सन फर्नाडिस, हरी खोबरेकर, सरदार ताजर, भावेश बटाव, ऋतिक बटाव, रोशन कांबळी यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन संजय पेंडूरकर यांनी केले. महेश भाट यांनी आभार मानले.