पर्यावरणातील घटकांच्या संवर्धनाबाबत युवा पिढीमध्ये जनजागृती गरजेची…

9
2
Google search engine
Google search engine

प्रियांका शेंगडे ; महा युथ फॉर क्लायमेट ॲक्शन कार्यशाळा संपन्न…

मालवण, ता. ३० : पर्यावरणात होणारे बदल आणि त्याचा हवा, पाणी, निसर्ग जैवविविधता आणि प्रामुख्याने आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता भविष्यात फार मोठी गंभीर समस्या आपल्यापुढे उभी राहणार आहे. यासाठी युवा पिढीला जागृत करून पर्यावरणातील या घटकांचे संवर्धन कसे करता येईल याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रियांका शेंगडे यांनी येथे केले.

येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे युनिसेफ मुंबई आणि पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महा युथ फॉर क्लायमेट ॲक्शन ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी युनिसेफच्या कन्सल्टंट श्रीमती प्रियांका शेंगडे, पर्यावरण शिक्षक केंद्र पुणे कार्यशाळा प्रमुख अवधूत अभ्यंकर, टीम मेंबर्स कुणाल जयस्वाल, मंगेश निकम, एमवायसीएचे मालवण प्रतिनिधी संजय वराडकर, सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, सोसायटी ऑफ सॅक्रेड हार्ट या संस्थेच्या श्रीमती रिटा पिंटो आदी उपस्थित होते. सुरुवातीस मनोजकुमार गिरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी श्रीमती शेंगडे, श्री. अभ्यंकर यांनी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात राबविले जाणारे काही मॉडेल्स पीपीटी माध्यमातून दाखविली. मालवण मध्ये येणारे पर्यटक आणि त्यांच्या माध्यमातून होणारे धूळ, धूर, वेस्ट प्लास्टिक पिशव्या बॉटल यांचे प्रदूषण तसेच यातून होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने उद्भवणाऱ्या गंभीर समस्या या सर्वांचे विचार मंथन या कार्यशाळेत करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शाळा महाविद्यालयामधून पर्यावरण या विषयाकडे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. या संदर्भात चर्चा करून बरेच नवीन मुद्दे समोर आले आहेत. या अनुषंगाने आपण सर्वांनी काम करण्यास सुरुवात करूया असा एक सूर या चर्चेतून उमटला. गटचर्चा करून यातून चर्चिलेल्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी युनिसेफ सारख्या जागतिक संस्थेने सन्मानित केलेल्या मेगल डिसोझा या विद्यार्थिनीचा सेवांगणतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत भंडारी आणि टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि इतर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांना कार्यशाळेचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यापुढे आपण सर्वांनी मिळून या चळवळीशी जोडून काम करणार असल्याचे अवधूत अभ्यंकर यांनी जाहीर केले. यावेळी बालविकास प्रकल्पच्या वैष्णवी आचरेकर, रुचिरा चिंदरकर या उपस्थित होत्या. यासाठी सेवांगणही सर्वतोपरी सहकार्य करेल असे संस्थेच्या वतीने कार्यवाह श्री. खोबरेकर यांनी सांगितले.