गोव्याकडे होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…

10
2
Google search engine
Google search engine

फिलिप्स रॉड्रिक्स यांचा आरोप; उद्या इन्सुली तपासणी नाक्यावर उपोषण…

बांदा,ता.०३: सिंधुदुर्गातून गोव्याकडे होणारे ओव्हरलोड खडी व वाळू वाहतूकीकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप ठाकरे गटाचे इन्सुली विभाग अध्यक्ष फिलिप्स रॉड्रिक्स यांनी केला आहे. दरम्यान ही बेकायदा वाहतूक सात दिवसात थांबण्यात यावी, अन्यथा उद्या इन्सुली चेक नाक्यावर बेमुदत उपोषण करू, असा त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्ध दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, इन्सुली चेक नाक्यावरून तसेच नजीकच्या इतर गावातून राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. काही वेळा दोन ब्रासची रॉयल्टी भरून चार ब्रासची वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून संबंधित कंपन्या स्वतःच्या तिजोऱ्या भरत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी सदर ठिकाणी लहान मोठे अपघातही वाढले आहेत तसेच वाहने भरधाव वेगाने जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक सात दिवसांच्या आत बंद करावी अशी मागणी फिलिप्स रॉड्रिक्स यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शाळकरी विद्यार्थी, नागरिक व प्रवासी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण मंगळवार 4 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता बेमुदत उपोषण छेडणार असल्याचे प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात फिलिप्स रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे.