५५ लाखांची फसवणूक, सातार्डा येथील तरुणाला अटक…

12
2
Google search engine
Google search engine

गुजरात पोलिसांची कारवाई; खात्यात जमा झालेले पैसे परत करण्यास नकार…

सावंतवाडी,ता.१२: चुकून खात्यात आलेले तब्बल ५५ लाख रुपये बड्या कंपनीला परत करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सातार्डा येथील एकाला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. झीलू राऊळ असे त्याचे नाव आहे. तत्पूर्वी कंपनीने त्याला संबंधित रक्कम परत करा, अशी विनवणी केली. परंतु त्याने आपले दोन वकील देत नकार दर्शविल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध गुजरात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल उशिरा हे पथक सावंतवाडीत दाखल झाले व त्याला रात्री अटक करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातार्डा येथील झीलू राऊळ यांच्या अकाउंट मध्ये गुजरात येथील “विल्सवन” या कंपनीचे तब्बल ५५ लाख रुपये चुकीने जमा झाले होते. कंपनीला आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी राऊळ यांना फोन करून असा प्रकार झाला आहे. त्यामुळे आमचे पैसे परत करा, अशी विनवणी केली. परंतु राऊळ यांनी मी पैसे परत करणार नाही. प्रसंगी न्यायालयात जाईल, असा इशारा दिला. त्यामुळे त्यात कंपनीचे दोन अधिकारी आठवडाभरापूर्वी सावंतवाडीत आले. त्यांनी सावंतवाडी पोलिसांची चर्चा करून राऊळ याला पैसे परत करण्यास सांगितले. मात्र राऊळ याने आपण पैसे परत करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट गुजरात मध्ये जाऊन राऊळ याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व न्यायालयाची परवानगी घेऊन काल गुजरात येथील पोलिसांचे पथक सावंतवाडीत हजर झाले. त्यानंतर रात्री उशिरा त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या काळात त्याने आपण वकील देतो, असे सांगून त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी त्याचे अकाउंट गोठवले व त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी आपण पैसे परत करतो. माझे गोठवलेले खाते सुरू करा, अशी त्यांनी मागणी केली. परंतु कंपनीने त्यासाठी नकार दिला. यावेळी आपण थेट मालकाशी चर्चा करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो, असे त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी कोणतीही चर्चा न करता त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.