किरकोळ कारणावरून सावंतवाडीत दोन गटात हाणामारी…

13
2
Google search engine
Google search engine

दोघे जखमी; नऊ जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल…

सावंतवाडी,ता.१९: किरकोळ कारणावरून झालेल्या वादात शिवीगाळ करून टोकदार हत्याराने व दांड्याने वार करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी सावंतवाडीतील ९ जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सालईवाडा साई मंदिर परिसरातील एका दुकानासमोर १४ तारखेला मध्यरात्री घडला. अथर्व विनय जगताप (वय १९), विनय जगताप (५१), करण विजय जगताप (१९) , प्रांजल जगताप (२१), दुर्गेश सावंत (२२) आणि आर्यन जगताप (१९) सर्व (रा. सावंतवाडी) अशी संबंधितांची नावे आहेत.
याबाबतची तक्रार साईश प्रताप निर्गुण (वय २५, रा. दीप रेसिडेन्सी सालईवाडा) याने दिली आहे. तर या प्रकरणी १४ तारखेला अथर्व जगताप यानी दिलेल्या तक्रारीनुसार साईश निर्गुण याच्यासह अन्य अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकाच्या डोक्याला तर दुसऱ्याच्या डोळ्याला लागल्याने दोघे जखमी झाले आहेत. त्यातील सर्वांना अटक करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकरी यांनी सांगितले.

हा प्रकार १५ तारखेला रात्री पावणे चार वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथील साई मंदिर परिसरातील एका दुकाना समोर घडला. यातील पहिली तक्रार १५ तारखेला दाखल झाली आहे. यात अथर्व विनय जगताप (वय १९) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईश निर्गुण यांच्यासह दोघे अज्ञात, असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत आपण पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात थांबलो असताना भाऊ करण याच्या सोबत जोर-जोरात बोलत होतो. यावेळी गैरसमज करून त्या ठिकाणी असलेल्या साईश व त्याच्या अन्य दोन मित्रांनी आपल्या कानफटीत मारले तसेच अन्य दोघा युवकांनी लाकडी दांडा घेऊन डोक्यावर मारून आपल्याला गंभीर दुखापत केले, अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज या प्रकरणी साईश निर्गुण याने तक्रार दिली आहे. यात आपण दुकानात पाण्याची बाटली घेण्याकरता गेलो असताना त्या ठिकाणी देवेश पडते याच्याशी बोलत होतो. यावेळी यातील संशयित अथर्व जगताप यांने आपल्याला काहीतरी बोलत आहे, असा गैरसमज करून तू कोणाला शहाणपणा शिकवतोस, असे सांगून आपल्याला शिवीगाळ केली तसेच डोळे फोडून टाकीन, अशी धमकी दिली तसेच आपण बेसावध असताना हातात टोकदार हत्यार घेऊन डोळ्यावर मारून दुखापत केली त्यानंतर सर्वांना बोलावत गैर कायदा जमाव करून आपल्याला लाथा-बुक्यानी तसेच हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यात आपल्याला दुखापत झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार आणखी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार ज्योती दुधवडकर यांनी दिली.