स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय झाल्यास शासनाला सळो की पळो करून सोडू…

18
2
Google search engine
Google search engine

हरी खोबरेकर ; किनारपट्टीवरील तात्पुरत्या झोपड्यांना शासनाने संरक्षण द्यायला हवे…

मालवण, ता. २७ : येथील किनारपट्टी भागातील मच्छीमार, स्थानिक भुमीपुत्र असलेल्यांनी पर्यटन क्षेत्रात उतरून आपला रोजगार उभारला आहे. किनारपट्टीवरच ज्यांचे आयुष्य गेले त्यांचा रोजगारही किनारपट्टीवर असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील त्यांच्या झोपड्यांना शासनाने खरे तर संरक्षण देण्याची गरज आहे. मात्र शासन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून मच्छीमारांना किनारपट्टीवरून कायमस्वरूपी हटविण्याचे काम केले जात आहे. यामुळे मच्छीमारांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या संघर्षात उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सक्रीयपणे सहभागी होणार आहे. स्थानिक भुमीपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही शासनाला सळो की पळो करून सोडू असा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, यतीन खोत, नरेश हुले, युवा संघटनेचे सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले, महेश जावकर आदी उपस्थित होते.
मच्छीमार समाज बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी पिढीजात बांधलेल्या झोपड्या आज तोडण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना कोणी दिले? हे सर्वप्रथम जाहीर व्हायला हवे. आम्ही आजपर्यंत मच्छीमार बांधवांच्या आणि पर्यटन व्यावसायिकांच्या पाठिशी राहून त्यांना संरक्षण देण्याचे काम केले आहे. कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कोणत्याही संघर्षामध्ये आम्ही पुढाकार घेऊ. मच्छीमार बांधव आणि पर्यटन व्यावसायिक ज्या ज्या वेळी आम्हाला साद देतील त्या त्यावेळी आम्ही पुढे उभे राहणार आहोत.
आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही लोकांच्या मनातील उमेदवार असलेल्या मंगेश टेमकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. सर्व पक्ष एकत्रिपणे लढत आहेत. शिवसैनिक एकदिलाने आणि एकविचाराने संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. टेमकर यांनी आजपर्यंत गावात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचेच पॅनेल विजयी होणार असल्याचा दावा श्री. खोबरेकर यांनी केला.
यावर्षीच्या शिवतिर्थावरील ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा हा न भुतो न भविष्यती असाच झाला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आदेश या मेळाव्यातून दिला असल्याने शिवसैनिक यामुळे आता न्याय प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशासकीय यंत्रणांतील जे अधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार त्यांना सहकार्य करणे आणि जे अधिकारी मुजोरगिरी करतील आणि जनतेला वेठीस धरतील त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शिवसैनिक आक्रमकपणे आता लढण्यासाठी सज्ज झाला असल्याचे श्री. खोबरेकर यांनी सांगितले.
सध्या सर्वत्र आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास येत आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात अगर गोवा बांबुळी याठिकाणी हलविले जाते. एकही कायम वैद्यकीय अधिकारी याठिकाणी कार्यरत असलेला दिसून येत नाही. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून याठिकाणी प्रशस्त असे ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले असताना त्याठिकाणी एकही शस्त्रक्रिया अगर महिलांची प्रसुती केली जात नाही. यामुळे सध्या रूग्णालय व्यवस्थेची दुर्दक्षा झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या कालावधीत रूग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि औषधांचा पुरवठा केला होता. आतातर औषधेही मिळताना कठिण झाले आहे. शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. प्राथमिक शाळा धनदांडग्यांच्या ताब्यात देण्यासाठी, खासगीकरण करण्यासाठी शिक्षणमंत्री प्रयत्नशिल आहेत तर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद करण्याच्याही घाट घातला जात आहे. यामुळे सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते ही सज्ज असल्याचे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.