साटेलीतून होणारी अवैध मायनिंग तात्काळ बंद करा, अन्यथा गाड्या फोडू…

21
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांचा इशारा; दादागिरी करुन मालवाहतूक होत असल्याची प्रांताधिकार्‍यांकडे तक्रार….

सावंतवाडी,ता.०५: साटेली तर्फ सातार्डा येथे १० वर्षापासून बंद असलेले मायनिंग बेकायदेशीररित्या पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांच्या जागेत अतिक्रमण करून रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा त्रास तेथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. दरम्यान हे मायनिंग सुरू करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे..? स्थानिक आमदार दिपक केसरकरांची भूमिका काय..? असा प्रश्न करत ही वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा त्या ठिकाणी असलेल्या गाड्या फोडू, असा इशारा आज संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रांताधिकार्‍यांना दिला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
साटेली तर्फ सातार्डा येथे डोंगरात बंद करण्यात आलेेले मायनिंग पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. दिवसाकाठी शेकडो डंपर आणून त्या ठिकाणावर साठवून ठेवण्यात आलेला माल नेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र यासाठी आवश्यक असलेली कोणती परवागनी घेण्यात आली आलेली नाही. उलट त्या ठिकाणी असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने खणून रस्ता करण्यात आला आहे. त्या रस्त्यासाठी काजू बागायती नष्ट करण्यात आल्या आहेत. याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर एका व्यक्तीकडून दादागिरीची भाषा केली जाते तसेच तुम्ही आमचे काय ते करून घ्या, आम्ही कोणाला घाबरत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. चुकीच्या पध्दतीने खोदकाम होणार असल्यामुळे त्या ठिकाणी डोंगराच्या खाली असलेल्या गावाला भिती आहे. डोंगर खचल्यास त्या ठिकाणी माळीण सारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले मायनिंग तात्काळ बंद करा आणि ज्या ठिकाणी पुन्हा साठा केला जात आहे त्या ठिकाणी आवश्यक तो पंचनामा करून संबंधितांना दंड करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान संबंधितांकडून दादागिरी करुन हा प्रयत्न सुरू राहिल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येवून त्या ठिकाणी येणार्‍या गाड्या फोडून टाकू, असा इशारा प्रशांत साटेलकर यांनी दिला तर मतदार संघाचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांना आम्ही फक्त निवडणूका पुरते आठवतो त्यानंतर मात्र ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे या प्रकाराबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विलास साटेलकर यांनी केली आहे.
यावेळी मिनल साटेलकर, विकास साटेलकर, रेश्मा साटेलकर, भारती कुबल, सुनिता कांबळे, अस्मिता नाईक, सुनिता नाईक, मधुकर नाईक, नंदकिशोर झारापकर, आनंद नाईक, प्रशांत साटेलकर, भालचंद्र नाईक, दत्ताराम कळगुंटकर, कृष्णा कळगुंटकर,अशोक साटेलकर, अर्चना साटेलकर, प्रकाश साटेलकर, आनंदी साटेलकर, साहिल कांबळी, सुनिल कांबळी, संजय कांबळी, प्रविण साटेलकर, अतुल पालव, अनिता पालव आदी उपस्थित होते.