वयाच्या विसाव्या वर्षी निरवडेचा रोहन गावडे झाला पखवाज विशारद…

313
2
Google search engine
Google search engine

प्रमोद गावडे यांच्या हस्ते सन्मान; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा…

सावंतवाडी,ता.१५:निरवडे येथील रोहन रामचंद्र गावडे या युवकाने पखवाज वादनात आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या पखवाज परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याने पखवाज “विशारद” ही पदवी प्राप्त केली आहे. त्याबद्दल त्याचा निरवडे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, निरवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, उमाकांत गावडे, नारायण माळकर, नारायण गावडे यांच्यासह गावातील युवक उपस्थित होते.
यावेळी प्रमोद गावडे म्हणाले, रोहन याने प्रामाणिक प्रयत्न करून आज पखवाज वादनात विशारद पदवी प्राप्त केली आहे. यशस्वीरित्या यश संपादन करून रोहन याने निरवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापुढे सुद्धा त्याने शिक्षण चालू ठेवून यापुढील पदवी प्राप्त कराव्यात आणि निरवडे परिसरात अजून पखवाज वादक घडवावे. त्यासाठी त्याला लागेल ते सहकार्य आम्ही निश्चितच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहन याला तालविश्व संगीत विद्यालयाचे संचालक मनीष तांबोसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोहन याने लहानपणापासूनच पखवाज वादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. आजूबाजूच्या परिसरात भजन परंपरेचा वारसा असल्याने त्याला भजनाची आवड निर्माण झाली होती. जिल्हाभरात झालेल्या भजन स्पर्धांमध्ये पखवाज वादनात विविध बक्षीस मिळविली आहेत. याबरोबरच त्याने जिल्ह्यात आपल्या वादन सादरीकरणातून ठसा उमटवला आहे़. व्यासपीठावर येण्यासाठी यातून त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी संपूर्ण कुटुंब, गुरुबंधू, मित्र परिवार यांच्या आशीर्वादामुळेच हे यश संपादन करू शकलो, असे मत रोहन गावडे यांनी व्यक्त केले.