मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा भव्यदिव्य निघणार…

247
2
Google search engine
Google search engine

भाऊ सामंत ; नियोजन बैठकीत विविध विषयावर चर्चा, ५ मार्चला पुढील बैठक…

मालवण, ता. २५ : शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी शहर बाजारपेठ मार्गांवरून निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यावर्षी २० वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीयांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघेल त्या दृष्टीने नियोजन सूरू करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समन्वयक भाऊ सामंत यांनी दिली.
शहरातील भरड दत्त मंदिर येथे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण सदस्यांची पहिली नियोजन बैठक झाली. यावेळी भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, संदीप बोडवे, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
९ एप्रिल रोजी गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्त निघणाऱ्या भव्यदिव्य शोभायात्रेत महाराष्ट्रातील नामवंत झांज व ढोल पथक सहभागी असणार आहे. सोबत घोडे, चित्ररथ, विविध वेशभूषा यांसह महाराष्ट्रीय संस्कृतिचे दर्शन विविध ग्रुपच्या माध्यमातून केले जाणार आहे. भगव्या उत्साहातील भव्यदिव्यता हिंदू नववर्ष स्वागत यात्रा माध्यमातून याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे.
प्राथमिक स्तरावर झांज व ढोल पथक यांच्यासोबत चर्चेची जबाबदारी बंटी केनवडेकर, भाऊ सामंत, संदीप बोडवे, अमित खोत यांच्याकडे देण्यात आली आहे. तर बॅनर, पत्रके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वरूप निश्चितीसाठी भाऊ सामंत, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यात अन्य सदस्य यांनाही पुढील बैठकीत सहभागी केले जाणार आहे. तसेच चित्ररथ, वेशभूषा, महाराष्ट्रीय संस्कृती दर्शन याबाबत पुढील बैठकीत समिती सदस्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सर्व सदस्य यांची पुढील बैठक ५ मार्च सायंकाळी ४ वाजता भरड दत्त मंदिर येथे होणार आहे. सर्व सदस्यांच्या एकत्रित चर्चेतूनच कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. मालवणवासिय हिंदू प्रेमी यांचा एकत्रित स्वरूपातील उत्स्फूर्त सहभाग हेच या स्वागत यात्रेचे आपलेपण असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.