सिंधुदुर्गात ३ मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविणार…

31
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२७: जिल्ह्यात ३ मार्चला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळून एकूण ३४ हजार ९०१ लाभार्थ्यांना एकूण ९०७ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८० मोबाईल टीम, ४९ ट्रांसिट टीम द्वारे जोखीमग्रस्त भाग, यात्रा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच लसीकरण दिनानंतर ग्रामीण भागामध्ये ३ दिवस व शहरी भागामध्ये ५ दिवस जिल्ह्यातील २ लाख ५ हजार २४ घरांना प्रत्यक्ष भेट देऊन ९०९ टीम द्वारे लसीकरण करण्यात येणार आहे .अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या नियोजनाबाबत आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेली २५ वर्ष सातत्याने पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाला यश येत असून भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजपर्यंत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. तर भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च २०१४ मध्ये मिळालेले आहे.

सन २०२३- २४ या वर्षात ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात मिळून ३४ हजार ९०१ एवढे लाभार्थी असून एकूण ९०७ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त ८० मोबाईल टीम, ४९ ट्रांसिट टीम याद्वारे जोखीमग्रस्त,दुर्गम भागातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर ३ मार्च रोजी होणाऱ्या लसीकरणानंतर पुढील ३ दिवस ग्रामीण भागामध्ये तर ५ दिवस शहरी भागामध्ये जिल्ह्यातील २ लाख ५ हजार २४ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन ९०९ आरोग्य पथकामार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात ९०७ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. तसेच ० ते ५ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकूण ३४ हजार ९०१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण बूथ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यरत ठेवण्यात येणार असून लसीकरणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे सकाळी ८ वाजता होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या सूक्ष्म नियोजनानुसार ट्रांसिट टीमद्वारे एसटी स्टँड, रेल्वे स्थानके, यात्रा स्थळे, विमानतळ, टोलनाके, इत्यादी ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच मोबाईल टीम द्वारे तुरळक लाभार्थी असणाऱ्या ठिकाणी वस्त्या, वाड्या, बांधकामाची ठिकाणे, खानकाम ,ऊसतोड मजूर, वीट भट्ट्या, इत्यादी ठिकाणी जाऊ न लसीकरण करण्यात येणार आहे. सदर टीम मध्ये दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून एक वाहन देण्यात आले आहे. ३ मार्च रोजी च्या लसीकरण नंतर जे लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार आहेत त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी भेटी देऊन लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये आवश्यक त्या सूचना सर्व संबंधित अधिकारी व विभागांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती यावेळी डॉ सई धुरी यांनी दिली.

आशा व अंगणवाडी कर्मचारी संपावर असल्याने लसीकरण मोहिमेसाठी मनुष्यबळ कमी पडणार आहे. तरी अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.मात्र जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांनी स्वतःहून येऊन पल्स पोलिओ लसीकरण या राट्रीय उपक्रमासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.