काळ्या फिती लावून शिक्षक भारतीचे जिल्ह्यात कामकाज…

75
2
Google search engine
Google search engine

संतोष पाताडे; शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत शासनाचा निषेध…

ओरोस,ता.२२: संचमान्यतेचे सुधारित निकष व शिक्षक संवर्गासाठी पेहरावा बद्दल मार्गदर्शक सूचना अन्यायकारक असल्याने त्याच्या विरोधात राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून शैक्षणिक कामकाज पाहत आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

शासन वेळोवेळी शिक्षणविभाग व शिक्षकांबद्दल वेगवेगळे जीआर काढून एक प्रकारे अन्याय करत असते. पण अश अन्याकरक जीआरच्या विरोधात शिक्षक भारती नेहमीच आवाज उठवत असते. त्यामुळे संचमान्यतेचे सुधारित निकष व शिक्षक संवर्गासाठी पेहरावा बद्दल मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत. पण शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर शासनाच्या या अन्यायकारी धोरणाविरोधात शिक्षक भारती शासनाचा निषेध म्हणून काळया फिती लावून शैक्षणिक कामकाज पाहत आहेत.

संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी यांचे नुकसान होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कलानुसार कला, क्रीडा, संगीत शिकण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येक विषयाला शिक्षक असणे तितकेच गरजेचे आहे. शिक्षकांच्या पेहरावाबद्दल शिक्षक नेहमीच काळजीवाहू असतात कारण शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे शिक्षकांच्या पेहरावाबद्दल मार्गदर्शक सूचना निर्गमित करून शिक्षकांवर एक प्रकारे अन्यायच केला आहे.

याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, कोषाध्यक्ष रवींद्र देसाई, उपाध्यक्ष जनार्दन पाटील, मालवण तालुका अध्यक्ष दिनकर शिरवलकर, सचिव कृष्णा कळकुंद्रिकर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनेश जाधव, जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे, राकेश कर्पे, किरण चेंडगे, उमेश खराबी, नागेश जाधव, प्रमोद कुडासकर, यशवंत गवस आदी शिक्षक भारती शिलेदार उपस्थित होते.