अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांची निर्दोष मुक्तता…

2498
2
Google search engine
Google search engine

मळगाव रेल्वे स्टेशनवरील घटना; गुंगीचे औषध देऊन केला होता प्रकार…

सावंतवाडी,ता.३०: गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. रामचंद्र अंकुश घाडी (रा.आकेरी), राकेश कृष्णा राऊळ व प्रशांत कृष्णा राऊळ दोघेही (रा. मळगाव) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना २१ सप्टेंबर २०१८ ला सावंतवाडी रेल्वे स्टेशन परिसरात घडली होती. या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन संशयितांनी संबंधित मुलीवर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सामूहिक अत्याचार केला होता. याप्रकरणी संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अधिक वृत्त असे की, फिर्यादी अल्पवयीन मुलीस संशयितातील एकाने तिचा बॉयफ्रेंड आहे. हे तिच्या घरच्याना सांगेन अशी धमकी देऊन तिला घरी सोडतो, असे सांगून जबरदस्तीने मळगाव रेल्वेस्टेशन जवळील एका लॉजवर नेले होते. तेथे तिला गुंगीचे औषध घालून पाणी प्यायला दिले. त्यानंतर गुंगी आल्यावर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच तिला लॉजवरुन बाहेर पडल्यानंतर रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असणाऱ्या अन्य दोघांनी ५० रुपये घेऊन फिर्यादीस त्यांच्या ताब्यात दिले. फिर्यादीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला असता दोघांनी तिला पाणी प्यायला दिले व तिला गुंगी आल्यावर जबरदस्तीने रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वरील शेडवर नेले व त्या दोघांनी देखील शारीरिक संबंध ठेवले, अशी फिर्याद सावंतवाडी पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती.

याकामी अॅड विवेक मांडकुलकर व अॅड संग्राम देसाई, अॅड भुवनेश प्रभू खानोलकर, अविनाश परब सुहास साटम आदींनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधीश सौ. एस. एस. जोशी यांनी तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.