राणेंसोबत गेलो याचा मला पश्चाताप, केसरकरांची वाटचाल अधोगतीकडे…

391
2
Google search engine
Google search engine

संदेश पारकरांची कबुली; म्हणूनच राजन तेलींना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवले असेल…

सावंतवाडी,ता.०५: “दो बेचारे, बिना सहारे” अशी अवस्था झाल्याने दिपक केसरकर आणि नारायण राणे हे दोघे एकत्र आले आहेत, काही वर्षांपुर्वी नारायण राणे यांच्या सोबत गेलो याचा मला पश्चाताप होत आहे. दीपक केसरकर यांची सुध्दा वाटचाल अधोगतीकडे चालली आहे, अशी कबुली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या ठिकाणी राजन तेली भविष्यातील आमदारकी मागतील किंवा, त्यांचा मुलगा प्रथमेश सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदावर दावा करेल म्हणून, केसरकरांनी त्यांना कदाचित निवडणुक प्रक्रियेतून दूर केले असेल. त्याच मुळे ते मतदान करा असे आवाहन करीत आहेत. परंतू कोणते चिंन्ह हे सांगत नाहीत असा चिमटा पारकर यांनी काढला.

श्री. पारकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, कॉंग्रेसचे समिर वंजारी, आपचे जिल्हाध्यक्ष विवेत ताम्हणकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पारकर यांनी केसरकरांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. ते म्हणाले, ७ वर्षे मंत्री असताना दिपक केसरकर आपल्या मतदार संघातील अनेक प्रश्न सोडवू शकले नाहीत, आश्वासना पलीकडे त्यांनी काहीही केले नाही. यात वेंगुर्ले-रेडी पोर्टचा प्रश्न उत्तम स्टील, वन संज्ञा, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रेल्वे टर्मिनस असे अनेक प्रश्न प्रलंबित राहीले आहेत. याबाबत त्यांना कोणतेही सुखदुःख नाही. त्यामुळे येणार्‍या काळात त्यांना जनता नक्कीच त्यांनी जागा दाखविणार आहे.

ते पुढे म्हणाले, जनाधार नसल्यामुळे केसरकर आणि राणे एकत्र आले असून लोकांची फसवणूक करीत आहेत. काही दिवसांपुर्वी हेच केसरकर राणेंना दहशतवाद, गुंड प्रवृत्ती असे सांगून टिका करताना दिसत होते. मात्र आत्ता त्यांनाच मते द्या असे सांगून मतांचा जोगवा मागत आहे. मात्र येथिल जनता सुज्ञ असून काही झाले तरी ते खासदार विनायक राऊतांना हॅट्रिक करुन पुन्हा लोकसभेत पाठवतील.