नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी तब्बल १४ गव्यांचा कळप…

527
2
Google search engine
Google search engine

नागरिकांत भीतीचे वातावरण; योग्य तो बंदोबस्त करा, वन विभागाकडे मागणी…

सावंतवाडी/भुवन नाईक,ता.२८: एकीकडे शहरात उपद्रव निर्माण करणार्‍या माकड व वानरांना रोखण्यासाठी सावंतवाडी वन विभागाने प्रगणनेचा शड्डू ठोकलेला असताना दुसरीकडे नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी १-२ नव्हे तर तब्बल १४ गव्यांचा कळप माठेवाडा भागात धुडगूस घालत आहे. त्या ठिकाणी लहान पिल्ला सोबत हा कळप फिरत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भर वस्तीत येणाऱ्या गव्यांना रोखा, अशी मागणी तेथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
येथील नरेंद्र डोंगरावर खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी स्थिरावलेले गवे कळपाने नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माठेवाडा होळीचा खुंट आदी भागात फिरताना दिसतात, तर दुसरीकडे पलीकडे असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर ते हजेरी लावतात. त्यामुळे यापूर्वी अपघात झाले आहे, तर काही दिवसापूर्वी यातील एका गव्याने थेट वनविभागाच्या कार्यालयाकडे हजेरी लावली होती. तर आठवडाभर आगोदर दोन गव्यांनी येथील डॉक्टर जयंत परूळेकर यांच्या हॉस्पिटल कडे दर्शन दिले होते. या दोन्ही घटनेत कोणाला दुखापत झाली नसती तरी, भरवस्तीत फिरणाऱ्या गाव्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी याबाबत योग्य ती भूमिका घेऊन भरवस्तीत येणारे गवे रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
दरम्यान काल रात्री उशिरा माठेवाडा भागात तब्बल १४ गव्यांच्या कळपाने तेथील एसी मॅकेनिक रिजवान शेख यांच्या घरासमोरील रस्त्यावर हजेरी लावली. तास भर ते गवे त्याच ठिकाणी होते त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार गेले अनेक दिवस गव्यांचा कळप त्या ठिकाणी फिरताना दिसत आहे. रात्री अपरात्री रस्त्यावर हे गवे येतात त्यामुळे अपघात किंवा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.