कार्यकर्तेच “मॅन ऑफ द मॅच”, कोणी एकटा नाही…

1043
2
Google search engine
Google search engine

राजन तेली; नुसतं मागून साधं जिल्हा परिषदच तिकीट तरी मिळत का…?

सावंतवाडी,ता.०८: लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाचे शिल्पकार हे खरे कार्यकर्तेच आहेत. त्यांच्याच मुळे हा विजय मिळाला. त्यामुळे एकट्याला “मॅन ऑफ द मॅच” म्हणता येणार नाही. सत्तेत असताना कोणी आमची पत्रे बाजूला करून ठेवली हे माहित आहे. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आम्ही काय नुसते गोट्या खेळायला आलो नाही, असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान या ठिकाणी मीच निवडणूक लढणार असे सांगणाऱ्याना साधे जिल्हा परिषदेचे तिकीट तरी मिळते का? याबाबतचा निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठांकडून होतो. त्यासाठी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करावे लागते. त्यामुळे या विषयावर आत्ताच गडबड नको, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

श्री. तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभा निवडणूकीच्या विजयानंतर राणेंनी मंत्री केसरकर हेच या निवडणूकीतील “मॅन ऑफ द मॅच” आहेत, असे विधान केले होते. याबाबत श्री. तेली यांना छेडले असता त्यांनी प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, या ठिकाणी २०१४ ला आल्यानंतर भाजपाच्या चिन्हावर फक्त बांदा ग्रामपंचायतीत निवडणूक लढली जात होती. मात्र वरिष्ठांनी आपल्यावर विश्वास टाकल्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवडणूका या स्वबळावर लढविण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे भाजपाचे चिन्ह घराघरात पोहोचले. त्यामुळेच हा विजय सहज झाला. त्यामुळे कार्यकर्तेच खरे “मॅन ऑफ द मॅच” आहेत, त्यात सिंहाचा वाटा रवींद्र चव्हाण यांचा आहे, असे तेली म्हणाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी नको, असे विधान करीत आपण काही झाले तरी आमदारकी लढविणार, असे सांगून तेली यांच्यासह विशाल परबांवर टिका केली होती. याबाबत श्री. तेली यांना छेडले असता. ते म्हणाले, या विधानावर मी आत्ताच काही बोलणार नाही. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यामुुळे प्रत्येक कार्यकर्ता निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो. परंतू त्या ठिकाणी पक्षाचे काम करणे गरजेचे आहे. संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. त्यानंतरच पक्षाच्या वरिष्ठांकडून संधी मिळते. नुसते मागून साधे जिल्हा परिषदेचे तिकीट मिळत नाही, असा टोला त्यांनी लगावत मी गेली ४० वर्षे मी या ठिकाणी समाजकारण करीत आहे. त्यामुळे मी काय नुसत्या गोट्या खेळायला आलो नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.