कुडाळ- मालवण विधानसभेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करा…

169
2
Google search engine
Google search engine

निलेश राणेंची शासनाकडे मागणी; सोनवडे, आंजीवडे घाट रस्त्याकडे वेधले लक्ष…

ओरोस,ता.१९: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करा, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी शासनाकडे केली आहे. यात अंजिवडे तसेच सोनवडे घाट रस्त्यासह जिल्हा रुग्णालयाचे बळकटीकरण अशा विविध विकास कामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारला दिलेले निवेदन प्रसिद्ध दिले आहे.

यात असे म्हटले आहे की, कुडाळ व मालवण तालुक्यात विकासकामांचा मोठा बॅकलॉक असून गेल्या दहा वर्षात इथे विकासनिधी मिळाला नाही. या अर्थ संकल्पात मालवण किनारपट्टीवरील देवबाग येथे धुपप्रतिबंधक बंधारा, तळाशील खाडीतील धूपप्रतिबंधक बंधारा, मसुरकर खोत जुवा येथील धूपप्रतिबंधक बंधारा, काळसेबागवाडी संरक्षण बंधारा, मेढा राजकोट येथे धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे, सर्जेकोट पिरवाडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे, रेवंडी भद्रकाली मंदिर येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे, कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे. बहुप्रतिक्षित सोनवडे-घोटगे घाटरस्ता तसेच माणगाव खोऱ्याच्या विकासाचा दरवाजा उघडणार आंजीवडे घाटरस्ता, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेला जिल्हा रुग्णालय व्यवस्था बळकटीकरण, कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे अद्यावत शवागृह, कुडाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व ग्रंथालय, सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासहित कुडाळ व मालवण तालुक्यातील गावंतर्गत खड्डेमय झालेले रस्ते, प्रमुख वर्दळीचे मार्ग, तसेच विविध विकासकामांसाठी भरीव निधीची मागणी श्री. राणे यांनी केली आहे.

 

शिंदे फडणवीस सरकारकडून कुडाळ मतदारसंघासाठी विकासनिधीची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करत निलेश राणे यांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचता यावं यासाठी योग्य नियोजन करून व आराखडा बनवत अर्थसंकल्पासाठी मागणी केली आहे.