हरित लवादाचा अवमान, ९ जणांना कारणे दाखवा नोटीसा…

300
2
Google search engine
Google search engine

बांदा तपासणी नाका प्रकरण; ४४ पैकी १६ हजार झाडे लावल्याने नवा वाद…

बांदा,ता.२५: सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही ४४ हजार पैकी केवळ १६ हजार झाडांचीच लागवड करण्यात आल्याने आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी हरित लवादाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर नऊ जणांना कारणे दाखवा नोटीसा बजाविल्या आहेत. याप्रकरणी १२ जुलैला सुनावणी घेऊन संबंधित विभागाला म्हणणे सादर करण्याचा आदेश हरित लवादाने दिला आहे. या प्रकरणात पाच कोटी रुपयांचा दंड संबंधिताना होऊ शकतो, अशी माहिती याचिकाकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिली आहे.

बांदा येथील सीमा तपासणी नाका हा विविध कारणांनी चर्चेत असून हरित लवादाने पुन्हा नोटीसा बजाविल्याने हा नाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लवादाने नोटीस मध्ये म्हटले आहे कि, लावादाच्या आदेशाचा अवमान झाला असून कलम २६ व कलम २८ नुसार ठेकेदार, पोटठेकेदार आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याठिकाणी दुर्लक्ष करून निसर्गाचा ऱ्हास केला आहे. सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात ४४ हजार झाडे लावण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात सर्वे केल्यानंतर १६ हजार झाडांचीच लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे. लागवड करण्यात आलेल्या झाडांचे योग्य संगोपन देखील करण्यात आले नाही. त्यामुळे अवमान केल्याने नोटीसा बजाविल्या आहेत. याबाबत १२ जुलै रोजी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना म्हणणे सादर करावे लागणार आहे.

या प्रकरणात संबंधितना ५ कोटी रुपये दंड होण्याची शक्यता आहे. तसेच बेकायदा खनिज उतखनन करताना ३५९. २५ कोटी रुपये स्टँपड्युटी भरण्यात आली नाही. प्रकल्पाची जमीन एनए करण्यात न आल्याने १३९ कोटी रुपये तसेच ग्रामपंचायतचा इमारत कर न भरल्याने ५० लाख रुपये आर्थिक दंड होऊ शकतो अशी माहिती श्री कल्याणकर यांनी दिली आहे.

महामार्गाच्या मध्यबिंदूपासून ७५ मिटरच्या आत बांधकाम करण्यात आले आहे. तसेच येथूनच जाणाऱ्या तिलारी उपकालव्यालगत देखील कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले आहे. नाक्याला २०३३ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. नाक्याला अतिरिक्त कालावधीसाठी परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.

येत्या २० जुलै पर्यंत तपासणी नाका सुरु न केल्यास स्थानिक प्रकल्पसाठी जमीन गेलेले शेतकरी, भूमिपुत्र हे नाका ताब्यात घेऊन सुरु करणार आहेत. अन्यथा आंदोलन छेडून नाका ताब्यात घेऊ.