जीवनात ध्येय, उद्दिष्ट ठेऊन वाटचाल केल्यास यश निश्चित…

67
2
Google search engine
Google search engine

डॉ. नितीन देशपांडे; कट्टा येथे शिक्षणव्रती पुरस्काराचे वितरण…

मालवण,ता.२८: आयुष्यात आपणाला काय व्हायचे आहे याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये ठाम ध्येय ठेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. जीवनात ध्येय, उद्दिष्ट ठेऊन वाटचाल केली तर अनेक मार्ग उपलब्ध होतील आणि हे मार्गच यशाचे शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन पुणे येथील शिक्षणप्रेमी डॉ. नितीन देशपांडे यांनी येथे केले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल कट्टा आणि डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथे कै. भ. रा. नाईक आणि चारुशीला नाईक स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा शिक्षणव्रती शिक्षक पुरस्कार वराडकर हायस्कुलचे शिक्षक श्री. प्रकाश कानूरकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, प्रमुख पाहुणे पुणे येथील राजलक्ष्मी देशपांडे, डॉ. प्रज्ञा अंजळ, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, केंद्रप्रमुख सावंत, श्रीमती सुतार, मुख्याध्यापक संजय नाईक, इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक हृषीकेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी आदी उपस्थित होते.

प्रारंभी हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या राजलक्ष्मी देशपांडे यांनी जीवनात मुल्यशिक्षण हा महत्वाचा भाग आहे. आज तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला तरी फसविण्याचे मार्गही तेवढेच वाढ़ले आहेत. आपले जीवन समृद्ध बनवायचे असेल तर जीवनात मूल्य शिक्षणाची तत्वे आचरणात आणली पाहिजेत असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी नाईक परिवारातर्फे दिला जाणारा शिक्षणव्रती पुरस्कार कानूरकर सरांना मिळाला आहे ही आनंदाची आणि अभिनंदनीय बाब आहे. परंतु या पुरस्काराने कानूरकर सरांची जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. निश्चितपणे कानूरकर सर ती जबाबदारी पार पाडतील असे ते म्हणाले. यावेळी सुनील नाईक यांनी सत्कार करण्याचे मुख्य कारण हेच असते कि बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यामधून प्रेरणा घ्यावी आणि आपलाही असा सत्कार व्हावा अशी मनातून इच्छा निर्माण व्हावी व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना आपण मिळविलेल्या यशाचे फळ मिळाले. यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला असल्याचे सांगितले.  सूत्रसंचालन संजय पेंडूरकर आणि वीणा शिरोडकर यांनी केले. पर्यवेक्षिका देवयानी गावडे यांनी आभार मानले.