कौशल्ये आत्मसात केल्याने यशस्वी जीवनाची नांदी…

48
2
Google search engine
Google search engine

विजकुमार वळंजू; कणकवली महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा…

कणकवली, ता.०२ : प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाबरोबर जीवन कौशल्ये आत्मसात करून यशस्वी जीवनाची नांदी उभारता येते असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली, मध्ये वाणिज्य विभाग, करियर कट्टा, अंतर्गत गुणवत्ता आणि हमी कक्ष आणि नांदी फाउंडेशन, महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ ते २९ जून २०२४ या कालावधीत सहा दिवसीय “जीवन कौशल्ये” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ही कार्यशाळा महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या केंद्रीय प्रमुख सौ. सीमा भागवत व राज्य समन्वयक श्री.पंकज दांडगे यांच्या समन्वयाने संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी अंतिम वर्षाच्या ५८ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी संवाद मुलाखत तंत्रे, इंग्रजी संवाद कौशल्य इत्यादी विविध कौशल्ये आत्मसात केली.
श्री.वळंजू म्हणाले, “व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्तीचे सामर्थ्य, सौंदर्य व संपन्नता, आत्मविश्वास, कार्यक्षमता, स्मरणशक्ती, संभाषण, नेतृत्व, वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, धेयनिष्ठा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा इत्यादी प्रकारे व्यक्तिमत्व विकास साधता येतो. स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा कार्यशाळेतून कौशल्ये सुधारण्याची संधी प्राप्त होते”
अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन, डॉ. राजश्री साळुंखे होत्या.
डॉ. राजश्री साळुंखे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “विद्यार्थीनीनी स्पर्धेच्या युगात यश प्राप्तीसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवावा. यासाठी व्यक्तिमत्व विकास साधणे अनिर्वाय आहे. विद्यार्थ्यानी स्वत:ची बलस्थाने ओळखावी, संधी ओळखून स्वतःमध्ये बदल घडवून, आलेली संधी स्वीकारून जीवनात यशस्वी व्हावे.” असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी, “या चर्चासत्रामुळे आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्याना आपल्या जीवनाला यशाची अनेक शिखरे पार पाडण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वाचे ठरतात ” असे मत व्यक्त केले.
महिंद्रा प्राईड क्लासरूम, नांदी फाउंडेशन पुणे’चे प्रशिक्षक म चिन्मय अभंगराव यांचा सत्कार करण्यात आला. “कोकणातील विद्यार्थीनीना योग्य मार्गदर्शन मिळाले तर भविष्य उज्ज्वल होऊ शकते. या कार्यशाळेमुळे सहभागी विद्यार्थीनीना आत्मविश्वासाबरोबरच सर्वांगीण विकास साधता येतो ‘ असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका लोकरे – प्रभू यांनी केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. रामदास बोलके व कार्यशाळेचे आभार डॉ. बी. एल. राठोड, (समन्वयक, करिअर कट्टा) यांनी केले. याप्रसंगी डॉ. बाळकृष्ण गावडे( समन्वयक अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष) श्री संजय ठाकूर (कार्यालय अधीक्षक) , प्रा. मनिषा सावंत, प्रा.नूतन घाडीगावकर, प्रा. पूजा सुतार, प्रा.आदिती मालपेकर आदी उपस्थित होते.