नगराध्यक्ष म्हणून साळगावकरच हवेत,सावंतवाडीकर जनतेचा रेटा…

89
2
Google search engine
Google search engine

गुप्त बैठकीत निर्णय; मनधरणी करण्याबरोबर न्यायालयात जाण्याची तयारी…

सावंतवाडी ता.०२: नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीत बबन साळगावकरच हवेत,यासाठी आवश्यक तो रेटा सावंतवाडीतील काही प्रतिष्ठित नागरिकांकडून सुरू करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.यासाठी काल सायंकाळी उशिरा गुप्त बैठक घेवून काही निर्णय घेण्यात आले आहेत.यात पालकमंत्री दीपक केसरकर व साळगावकर यांची मनधरणी करण्याबरोबर प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी घेण्याचा निर्णय या गटाकडून घेण्यात आल्याचे समजते,याबाबत साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता आत्ताच काही बोलत नाही,असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.त्यामुळे या बैठकीबाबत “सस्पेन्स” वाढला आहे.
सावंतवाडीचे नगराध्यक्ष असलेल्या बबन साळगावकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यांनी राष्ट्रवादी मधून विधानसभा लढवली.परंतु त्या ठिकाणी त्यांना यश आलेले नाही.या सर्व धामधुमीत त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा साळगावकरच एकदा नगराध्यक्ष म्हणून बसावेत,अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.अनेक नागरिक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान त्यांनी आपला राजीनामा दिला असला तरी कायदयातील त्रुटीमुळे तो मंजूर होवू शकत नाही,असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे.कायद्यानुसार एखाद्या आमदाराने आपला राजीनामा स्वतःहून थेट सभापतीकडे दयायचा असतो,त्याचप्रमाणे नगराध्यक्ष कींवा नगरसेविकाने आपला राजीनामा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावयाचा असतो.परंतु साळगावकरांनी आपला राजीनामा थेट जिल्हाधिकार्‍यांकडे न देता मुख्याअधिकाऱ्यांकडे दिल्याने कायदेशिर त्यांना पळवाट मिळाली आहे.हाच धागा पकडून साळगावकर यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून बसावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया साळगावकरांनी लढावी आणि सावंतवाडीच्या विकासासाठी पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून विराजमान व्हावे,असे या लोकांचे म्हणणे आहे.त्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घ्यावी,अशी मागणी संबंधित नागरिक पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे समजते.
श्री.साळगावकर यांनी जरी केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी पालकमंत्री केसरकर यांनी त्यांच्या विरोधात टोकाला जावून कोणतेही विधान केले नव्हते.त्यांचा नेहमी गुरुबंधू असा उल्लेख करून त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले होते.तसेच सावंतवाडी शहराच्या विकासासाठी स्वच्छ चारित्र्य असलेल्या साळगावकर यांची शहराला गरज आहे.असे वारंवार केसरकर यांनी वक्तव्य केले होते.त्यामुळे आयत्यावेळी दीपक केसरकर हे सुद्धा सध्या या गोष्टीला समर्थन देतील,असे नागरिकांचे म्हणणे आहे.यावरून आता वेगळा रंग जाण्याची शक्यता असून आता बबन सागावकर आणि केसरकर कोणती भूमिका घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.